राज्यात पावसाची शक्यता, वादळासह मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट होणार
राज्यावर सध्या कोरोनाचे संकट कायम आहे. त्यात आता पावसाचे संकट घोंगावत आहे. पुढील चार दिवसात अनेक भागात जोरदार पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वादळासह मेघगर्जसह पाऊस बरसणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा याठिकाणी वादळी पाऊस कोसळेल. अहमदनगर, पुणे, बीड आणि कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Rain in Maharashtra)
मराठवाडा ते दक्षिण तामिळनाडूच्या समुद्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा अजूनही तसाच आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात आणि राज्याच्या काही भागात पुढील चार दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा इशारा हवामाना विभागाने दिला आहे. सध्या आंबाचा सिझन आहे. त्यामुळे या पावसाचा आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस होईल. उद्या काही ठिकाणी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.