देश

Buldhana: तहसीलदारांच्या केबिनमधील स्वछतागृहातच तलाठ्याची आत्महत्या

जिल्ह्याच्या नांदुरा येथील तहसील कार्यालयाच्या स्वछतागृहात तलाठ्याने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना आज सकाळी ९ वाजता उघडकीस आली. अनिल अंभोरे असे आत्महत्या करणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे.

तहसीलदार यांच्या केबिनमध्ये कुणीतरी आत्महत्या केल्याचे वृत्त नांदुरा शहरात वाऱ्यासारखे पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, अंभोरे हे नांदुरा तहसील कार्यालयातच कार्यरत होते. ते आज सकाळी घराबाहेर पडले. ते तणावात होते. रस्त्यात एका वाहनचालकाला त्यांनी थांबवले. त्याला चाकूचा धाक दाखवला. ‘मला नांदुरा तहसील कार्यालयात सोड, असे त्यांनी वाहनचालकाला सांगितले. वाहनचालकाने त्यांना तहसील कार्यालयाच्या गेटपर्यंत सोडले होते. दरम्यान, सकाळची वेळ असल्यामुळे कार्यालय परिसरात कमी गर्दी होती.

सफाई कर्मचारी कार्यालयातील सफाईचे काम करण्यात व्यग्र होते. दरम्यान तलाठी अनिल अंभोरे यांनी तहसीलदार यांच्या मुख्य केबिनमध्ये प्रवेश केला. तेथे तहसीलदार नव्हते. त्यांनी केबिनमधील बाथरूममध्ये जाऊन खिडकीला दोरी बांधून गळफास घेतला. गेल्या एका वर्षापासून ते आपली कार्यालयीन कामेसुद्धा करत नव्हते. अनेक शेतकऱ्यांच्या तशा तक्रारी होत्या. पण लोकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात होते, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच, त्यांची पत्नी मंगलाबाई अंभोरे व आदित्य व विशाल या दोन मुलांनी नांदुरा तहसील कार्यालय गाठले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा झाल्यावर त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

Related Articles

Back to top button