Assembly Elections 2021 : तमिळनाडू निवडणुकीपूर्वी कारवाई, ४२८ कोटींचा ऐवज जप्त
तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ दरम्यान, उद्या अर्थात मंगळवार, ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. परंतु, यापूर्वीच राज्यभरात एकूण ४२८ कोटी रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिलीय. यामध्ये रोख पैसे, सोनं आणि चांदी यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या या ऐवजात २२२.५ कोटी रुपयांची रोख रक्कम तसंच १७६.११ कोटी रुपये मूल्याच्या सोन्या-चांदीचा समावेश आहे.
गेल्या काही आठवड्यांत राज्यांत विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये ही कारवाई करण्यात आलीय. राज्याची राजधानी चेन्नईमध्येही काही ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारुही जप्त करण्यात आली.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकाठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. गेल्या २४ तासांत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलीय.
रानीपेट जिल्ह्यात २१.५६ लाख रुपये, चेन्नईच्या थाउजन्ड लाईटस् विधानसभा मतदारसंघातून १.२३ कोटी रुपये तसंच सलेमच्या वीरापंडीत १.१५ कोटी रुपयांच्या जप्तीची कारवाई करण्यात आलीय.
निवडणुकीच्या ७२ तासांपूर्वीचा खर्च खूपच संवेदनशील असतो. त्यामुळे सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेससोबत मिळून २४ तास कठोर तपासणी करण्यात आली, असं निवडणूक आयोगानं म्हटलंय.