हात जोडून विनंती, नियमांचं पालन करा अन्यथा…! इक्बालसिंह चहल यांचा इशारा
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी बीकेसी कोव्हिड रुग्णालयात कोरोना लस घेतली. चहल यांनी नागरिकांना लॉकडाऊन टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याची हात जोडून विनंती केली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.
‘मुंबईत 16 जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरूवात झाली. आतापर्यंत आपण 10 लाखापेक्षा जास्त जणांना लस दिली आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त लसीकरण बीकेसी रुग्णालयात झाले आहे. आतापर्यंत 40 ते 45 हजार दिवसाला लसीकरण सुरू आहे. मुंबईतील लसीकरणाचा वेग वाढवत दिवसाला 1 लाखापर्यंत लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे’ चहल यांनी यावेळी सांगितले
राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी की, Door to door लसीकरण करण्याची परवानगी मिळावी. असे झाल्यास मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवता येईल.
‘गेल्या 48 दिवसात 85 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना मास्क न वापरणाऱ्य़ांकडून 48 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे’. असेही चहल म्हटले
लॉकडाऊन बाबत बोलताना चहल म्हणाले की, ‘लॉकडाऊन करायचा का नाही हे लोकांच्या हातात आहे. नियमांचे पालन केले तर लॉकडाऊनची गरज नाही, नियमांचे पालन न झाल्यास आणि कोरोना रुग्णसंख्या वाढत गेल्यास नाइलाजाने लॉकडाऊन करावे लागेल. त्यामुळे लोकांना हात जोडून विनंती करतो की नियमांचे पालन करा’.