बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबारानंतर सध्या मुंबई पोलिसांची यंत्रणा हाय अलर्टवर आहे. असं असतानाच आता मुंबईच्या महापौर कार्यालयाला धमकीचा ई मेल प्राप्त झालाय. 31 ऑक्टोबर आणि 27 नोव्हेंबरला स्फोट घडवण्याची धमकी दिल्याचा ई-मेलमध्ये दावा करण्यात आला असून यात 31 ऑक्टोबरला शाळेवर ग्रेनेड हल्ला करण्याची धमकी आहे. 27 नोव्हेंबरला महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याचा उल्लेख करण्यात आलाय. एवढंच नाही तर ईमेलमध्ये अमिताभ बच्चन यांचा जलसा बांगला आणि दलजीत दोसांज याच्या कॉन्सर्टबाबत सुद्धा धमकी देण्यात आली आहे. उल्लेख ई-मेलमध्ये खलिस्तान आणि काही संघटनांच्या नावांचा उल्लेख असून धमकीच्या ई मेलमुळे सुरक्षा यंत्रणांसमोर सतर्कतेचे आव्हान आहे.
मुंबईतील शाळांमध्ये बॉम्ब हल्ल्याची धमकी :
मुंबईत बॉम्ब हल्ल्याच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंता वाढली आहे. एका ईमेलमध्ये मुंबई महापौर कार्यालयावर दुपारी 3: 11 वाजता आणि शाळेवर दुपारी 1: 11 वाजता बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. हा ईमेल शुक्रवार 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 11: 31 वाजता पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. हा ईमेल स्मिथ जॉन्सन नावाच्या व्यक्तीच्या ईमेल आयडीवरून मुंबई महापौर रितू राजेश तावडे, नगरसेविका रितू तावडे आणि नगरसेवक संजय शंकर घाडी यांना उद्देशून पाठवण्यात आला आहे.
या ईमेलमध्ये ‘खलिस्तान जिंदाबाद’ असे लिहिले असून लोकांना आपल्या मुलांचे संरक्षण करण्याचा इशारा दिला आहे. त्यात 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान विविध ठिकाणांना लक्ष्य करण्याचा उल्लेखही आहे. या ईमेलमध्ये 31 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ या निवासस्थानावर ग्रेनेड हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यात 1984 च्या शीख नरसंहाराचा संदर्भ देत ‘रक्ताचा बदला रक्त’ असा उल्लेख आहे.
याशिवाय 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर होणाऱ्या पंजाबी गायक आणि अभिनेते दलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये रेसकोर्सवर बॉम्बस्फोट घडवण्याचा आणि दलजीत दोसांझ यांना लक्ष्य करण्याचाही उल्लेख आहे. या ईमेलमध्ये खलिस्तान नॅशनल आर्मी आणि बब्बर खालसा यांच्यासह काही व्यक्तींची नावेही आहेत. तथापि, ईमेलमधील दाव्यांची आणि धमक्यांची सत्यता स्वतंत्रपणे पडताळण्यात आलेली नाही.








