रायगडच्या दिवेआगरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी 8 जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने आठही जण बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. हे विद्यार्थी पुण्यातील आळंदी येथून आले होते. एका खासगी क्लासने काढलेल्या सहलीचा ते भाग होते. सर्व आठही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
समुद्रात बुडालेले विद्यार्थी हे पुण्यातील आळंदी विनर्स अकॅडमीचे असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. विनर्स अकॅडमीमध्ये अकरावी, बारावी सायन्सचे क्लासेस घेतले जातात. याच क्लासेसची सहल रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथे गेली होती.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 25 मुले, 17 मुली आणि सहा शिक्षक अशा 48 जणांचा गट सायंकाळी साडेपाचच्या सुमारास समुद्रकिनाऱ्यावर सहलीसाठी गेला होता. त्यातील आठ विद्यार्थी समुद्रात उतरले; मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले.
तात्काळ प्रतिसाद देत, दिवेआगर येथील ‘भाऊ मारुती साळुंखे महाकाली वॉटर स्पोर्ट्स’चे मालक भाऊ साळुंखे यांनी आपल्या टीमसह त्वरित बचावकार्य सुरू केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, या वॉटर स्पोर्ट्स टीमने समुद्रातून सर्व आठही मृतांचे मृतदेह बाहेर काढले. स्थानिक नागरिकही मदतीसाठी धावले होते.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच, दिघी सागरी (बोर्ली पंचतन) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) संतोष आवटी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदन व आवश्यक कायदेशीर कार्यवाहीसाठी ते बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.
मृत विद्यार्थ्यांची नावे –
1) यश किरण वानखेडे आळंदी 16
2) सोहम तुकाराम भांडवलकर 16 आळंदी
3) तन्मय दत्तात्रय वहिले 16
4) कौस्तुभ संदीप दौंड
5) कैवल्य सतीश वासनकर
6) राजवीर युवराज वहिले
7) प्रणव रामदास बनसोडे
8) सुमित भारत अहिरे








