Search
Close this search box.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी! अटल सेतूवरुनही मोफत प्रवास, पण हे एक काम केलं तरच; अन्यथा भरावे लागणार पैसे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदा शासनाकडून मोठा दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून (टोल) सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. 11 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत मुंबई–बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवरील पथकर नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. याशिवाय नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांनाही पथकरमाफीचा लाभ मिळणार आहे.

मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे अशी माहिती परिवहनंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ‘गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्वतंत्र स्टिकर किंवा पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार आहे. परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस विभाग आणि संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या समन्वयातून आवश्यक त्या ठिकाणी हे पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलिस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या तसेच आरटीओ कार्यालयांमध्येही पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सदर पास परतीच्या प्रवासासाठीदेखील ग्राह्य धरला जाणार असल्याने कोकणातून परतताना गणेशभक्तांना पुन्हा टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचं परिपत्रक

आगामी सन-2026 च्या गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्याची व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

१. दि.११.०९.२०२६ ते दि.२७.०९.२०२६ या कालावधीमध्ये मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम-४८), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (राम-६६), सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणात जाणारे रस्ते व नगर विकास विभागाच्या अखत्यारितील अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूमार्ग या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सवलत देण्यात येत आहे.

….तरच मिळणार टोलमाफी

अ) याकरिता सोबत जोडल्याप्रमाणे “गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन” अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पासेस त्यावर गाडी क्रमांक, चालकाचे नांव असा मजकूर नमूद करुन ते स्टीकर्स (पासेसचा नमुना सोबतचे जोडपत्र अ प्रमाणे) आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेस मध्ये उपलब्ध करुन देण्यात यावेत. तसेच सदरचे पास परतीच्या प्रवासाकरीता ग्राह्य धरण्यात येतील.

ब) गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बसेस महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातून येणार आहेत. तेथील पोलीस विभाग किंवा प्रादेशिक परिवहन विभाग यांचेकडे वरील “अ” प्रमाणे पासेस उपलब्ध करुन देण्यात येतील. संबंधित जिल्ह्यातून गौरी-गणपती वाहतूकीसाठी रवाना होणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकर माफी असलेले पासेस लावून/चिकटवून सदरच्या बसेस रवाना होतील.

२. ग्रामीण वा शहरी पोलीस / प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेमार्फत दिल्या जाणाऱ्या पासेसची संख्या बाबतीत एकत्रित माहिती उप सचिव (खा.र.१), सार्वजनिक बांधकाम विभाग, ४ था मजला, मंत्रालय, मुंबई-३२ यांना माहितीकरिता सादर करावी.

३. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्याकरीता आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना / जाहिरात प्रसिध्द करावी.
उपरोक्त सुचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२६०९०८१७०७५९०४१८ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

admin
Author: admin

और पढ़ें