राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदेंची तब्बेत बिघडली असून उपचारासाठी त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून शिंदेंना वायरल इन्फेक्शन झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. सध्या एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शिंदेंना नेमकं झालंय काय?
कामाचा अतिताण, व्हायरल फिव्हर आणि प्रचंड अशक्तपणा जाणवत असल्याने शिंदेंना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असं शिंदे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.
दौरे आणि राजकीय कार्यक्रमामुळे झाली शिंदेंची धावपळ
खरं तर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच एकनाथ शिंदेंना ताप आणि सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. मागील काही दिवसांपासून शिंदे सतत राजकीय दौऱ्यांवर आहेत. कधी महाराष्ट्रातील एखाद्या शहरामधील भेटीगाठी तर कधी दिल्लीतील वाऱ्यांमुळे शिंदेंची दमछाक झाल्याचं सांगितलं जात आहे. अनेकदा शिंदे रात्री उशिरापर्यंत बैठकी घेतात. बऱ्याचदा रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांनाही शिंदे हजर असतात. यामुळेच त्यांना प्रचंड थकवा जाणवत आहे. शिंदे हे ठाण्यातील निवासस्थानी असतानाही कार्यकर्त्यांची रिघ सुरुच असते. त्यामुळे ते खासगी निवासस्थानीही कामातच व्यस्त असल्याचं दिसून येतं.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झाले एकनाथ शिंदे
विशेष म्हणजे विश्रांती न मिळाल्यामुळे त्यांना मागील काही दिवसांपासून प्रचंड अशक्तपणा जाणवत असूनही ते सलाईन लावून दौरे करत होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरी उपचार देण्याऐवजी रुग्णालयात दाखल करून सलाईन आणि आवश्यक औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे सर्व शासकीय दौरे आणि राजकीय कार्यक्रम तात्पुरते पुढे ढकलण्यात किंवा रद्द करण्यात आले आहेत.
यापूर्वीही रुग्णालयात केलेलं दाखल
2024 साली महाराष्ट्र विधानसभा निवडणूकच्या निकालानंतर सततची धावपळ, ताणतणाव आणि साताऱ्यातील त्यांच्या गावी भेट दिल्यानंतर त्यांना ताप आला आणि घशाचे इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे 3 डिसेंबर रोजी त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या आणि ‘फुल हेल्थ चेकअप’ झाल्यानंतर त्यांना काही तासांतच डिस्चार्ज देण्यात आला होता व डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता.








