परभणीतून एक दुखद घटना समोर येत आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथे प्रसिद्ध हनुमान मंदिरासमोरील सभा मंडप कोसळला आहे. या सभा मंडपाखाली 30 ते 40 जण दबल्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. प्रशासनाकडून सभा मंडपाच्या खाली दबललेल्या भाविकांना काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आतापर्यंत समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत 8 ते 10 भाविक जखमी झाले आहेत.
परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडीमधील हनुमान मंदिर हे प्रचंड प्रसिद्ध आहे. राज्यभरातून अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. याशिवाय आज शनिवार आहे. दर शनिवारी अनेक भाविक हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात. त्यामुळे यशवाडीतील हनुमान मंदिरात शनिवारी भाविकांची गर्दी असते. याशिवाय अनेकांना शनिवार-रविवार सुट्टी असल्याने अनेक भाविक राज्याच्या विविध भागांतून इथे दर्शनासाठी येतात.
नेहमीप्रमाणे आजदेखील अशीच भाविकांची गर्दी हनुमान मंदिराच्या परिसरात होती. याच वेळी अचानक मंदिरासमोरील सभा मंडप कोसळला. या सभा मंडपाखाली 30 ते 40 भाविक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झालं आहे. प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरु झालं आहे.
घटनास्थळी पोलीस, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक नेतेमंडळी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्या भाविकांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. ढिगाऱ्याखालून काढलेल्या काही जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच ढिगाऱ्याखाली दबलेल्या भाविकांचे देखील बचावकार्य केले जात आहे. क्रेनच्या सहाय्यातून बचाव कार्य केले जात आहे. नागरिकांना अनावश्यक गर्दी करु नये, असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.
घटनास्थळी किंकाळ्या अन् भीती
खरंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आपल्यासोबत असं काही घडेल असं कधीच वाटलं नव्हतं. सभा मंडपाचं काम सुरु होतं. आज शनिवार असल्याने मंदिर परिसरात नेहमीप्रमाणे गर्दी होती. याच गर्दीतील काही भाविकांवर सभा मंडपाचा काही भाग कोसळला. हा सभा मंडप कोसळल्यानंतर मोठी खळबळ उडाली. प्रचंड आक्रोश आणि किंकाळ्या परिसरात ऐकू येऊ लागल्या. प्रचंड खळबळ उडाली. उपस्थित भाविकांनी आणि मंदिर प्रशासनाशी संबंधित काही जणांनी तातडीने बचावकार्य सुरु केले. तसेच पोलिसांनादेखील तातडीन या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आणि आजूबाजूच्या गावांमधून लोक बचावासाठी येऊ लागली. सध्या बचावकार्य अद्यापही सुरु असल्याची माहिती आहे.








