राष्ट्रीय शैक्षणिक साक्षरता अभियान धोरणानुसार अभ्यासक्रमानुसार पुनर्रचित गतवर्षी पहिलीची पुस्तके बदलल्यानंतर, यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पुस्तके बदलण्यात आली आहेत. बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षात प्रथमच एकाच वर्षात चार इयत्तांची पुस्तके बदलण्यात आली असून, ही सर्व नवी पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
क्यूआर कोड स्कॅन केल्यावर संपूर्ण धडा
बालभारतीने तयार केलेली ही नवी पाठ्यपुस्तके विद्यार्थी-केंद्रित, कौशल्याभिमुख आणि अनुभवाधारित आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमता, अध्ययन निष्पत्ती आणि कौशल्य विकासाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. प्रत्येक धड्या च्या सुरुवातीला अपेक्षित अध्ययन निष्पत्ती नमूद करण्यात आली असून, शिक्षकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. या पुस्तकांमध्ये क्यूआर कोडद्वारे ई-कॉन्टेंट उपलब्ध करण्यात आला असून, तो स्कॅन केल्यावर विद्यार्थ्यांना संपूर्ण धडा वाचता येणार आहे. नव्या पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांची विचारशक्ती, आकलन क्षमता आणि प्रत्यक्ष जीवनातील कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच चित्रमय मांडणी, कृतीआधारित शिक्षण, उदाहरणे आणि सराव प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.
सीबीएसईच्या पुस्तकात सुधारणा; मराठा इतिहासावर 20 पानं
सीबीएसईच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्यावर केवळ दीड पानांचा मजकूर होता. आता मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा 20 पानांचा सविस्तर इतिहास समाविष्ट करण्यात आल्याची माहितीही दादा भुसे यांनी दिली. नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि कौशल्याधारित शिक्षण मिळण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
इयत्ता पाचवी, आठवीच्या मूल्यमापनाचा आज निकाल
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत इयत्ता पाचवी प्राथमिक स्तर व इयत्ता आठवी उच्च प्राथमिक स्तराच्या मूल्यमापनासाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांसाठी 15 ते 25 एप्रिल या कालावधीत मूल्यमापन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मूल्यमापनाचा निकाल www. msbos. mh-ssc. ac. in या संकेतस्थळावर 11 जून 2026 रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची संकेतस्थळावर विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना निकालाची प्रत घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांचे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र लवकरच वितरित करण्यात येईल.








