Search
Close this search box.

विमानतळ बंद होतंय? जुलै ते ऑक्टोबरमध्ये मर्यादित उड्डाणं, प्रवाशांसाठी महत्त्वाचं….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भारतीय नागरिकांचा पर्यटनाचा हंगाम म्हटलं की दिवाळी, मे महिना आणि नाताळच्या सुट्ट्या हे हमखास गर्दीचे दिवस. याव्यतिरिक्त सुद्धा हल्ली संधी मिळेल तेव्हा आणि मुख्य म्हणजे प्रवासाच्या साधनांची उपलब्धता पाहूनसुद्धा भटकंतीचे बेत आखले जातात. खिशाला परवडणाऱ्या दरात विमान तिकीटं असतील, तर कैक मंडळी तातडीनं एखादं ठिकाण निवडून प्रवासाला निघतात. मात्र, येत्या काळात विमान प्रवासात प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण, प्रवाशांची ये-जा सातत्यानं सुरू असणारा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा विमानतळ एकदोन नव्हे तर, 16 दिवस बंद असेल. ज्यामुळं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर या गैरसोयीचा थेट परिणाम पाहायला मिळेल.

कोणत्या विमानतळावरील सेवा खंडित? 

जुलै ते ऑक्टोबर या काळात विविध दिवशी पर्यटनाच्या दृष्टीनं कायमच वर्दळीचा असणारं श्रीनगर विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. धावपट्टीची अनेक कामं रखडली असल्या कारणानं विमानतळ प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. ऐन पर्यटनाच्याच हंगामात विमानतळावरील सेवा खंडित होणार असल्यामुळं प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागेल. कारण, ऑक्टोबर महिन्यात सलग 16 दिवस येथील सेवा विस्कळीत असतील. (Travel Jammu Kashmir)

श्रीनगर विमानतळ प्रशासनानं भारतीय वायुदलाच्या मदतीनं ठराविक सत्रांमध्ये विमानतळाच्या देखभाल कार्यक्रम तयार केला असून या नियोजनामुळं जुलै ते ऑक्टोबररम्यान जम्मू काश्मीरमध्ये येणाऱ्या आणि इथून निघणाऱ्या विमानसेवा प्रभावित होतील. 1 जुलै 2026 ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंच दर सोमवार आणि मंगळवारी या विमानतळावरील धावपट्टी क्रमांक 1 बंद ठेवण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमास मंजुरी मिळाल्यास काश्मीरच्या भटकंतीसाठी येणाऱ्यांना फटका बसू शकतो.

1 ऑक्टोबर 2026 ते 16 ऑक्टोबर 2026 पर्यंत धावपट्टी पूर्णपणे बंद ठेवण्याचा प्रस्ताव असून, यादरम्यान विमानतळावरून कोणत्याही विमानाचं उड्डाण अथवा लँडिंग होणार नाही, ज्यामुळं एका मोठ्या काळासाठी जम्मू काश्मीरमधील हवाई प्रवास प्रभावित होईल. सदर नियोजनासंदर्भात श्रीनगर विमानतळ प्रशासनानं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक स्वरुपात विमानतळ 1 जुलै 2026 ते 30 सप्टेंबर 2026 (धावपट्टी क्रमांक 1) सोमवार- मंगळवारी उपलब्ध नसू शकतो. सध्या ही प्रक्रिया नियोजन टप्प्यावर असून, अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित माध्यामांतून याबाबतच्या स्पष्ट सूचना जारी करण्यात येतील असं म्हटलं.

काश्मीरच्या पर्यटनाला धक्का?

काश्मीरच्या पर्यटनाला या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास धक्का पोहोचू शकतो. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनव्यवस्था विस्कळीत झाली होती. त्यातच आता हवाई प्रवास दीर्घ काळासाठी बंद राहीला तर, काश्मीरमध्ये ज्यांनी आगामी दिवसांसाठीचे बेत आखले आहेत ते रद्दही होऊ शकतात. त्यामुळं पर्यटनावर उपजिवीकेची साधणं असणाऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान होईल ही बाब नाकारता येत नाही.

सदर बदलांबाबत चेंबर ऑफ कॉमर्स कश्मीरचे अध्यक्ष तारिक गनी यांच्या म्हहण्यानुसार हा प्रस्ताव अतिशय दुर्दैवी आहे. ज्यावेळी काश्मीरचं पर्यटन क्षेत्र अनेक आव्हानांचा सामना केल्यानंतर आता कुठं डोकं वर काढत आहे, त्यातच या निर्णयामुळं या क्षेत्रावर विपरित परिणाम दिसू शकतात असं त्यांनी म्हटलं. जुलै महिन्यात यामुळं फारसा बदल अपेक्षित नसला तरीही ऑक्टोबरमध्ये मात्र ऐन पर्यटनाच्या दिवसांत मात्र काश्मीरमध्ये येणाऱ्यांचा आकडा मोठ्या फरकानं घटू शकतो हा मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिला.

दरम्यान, विमानतळाच्या देखभाल आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं दृष्टीक्षेपात असणाऱ्या कामांचा प्रस्ताव नियोजन स्तरावर असून, त्यावर अद्यापही अधिकृत शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. ज्यामुळं आता काही पर्यायी सुविधांवरही विचारविनिमय केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार विमानतळावरील धावपट्टीची दीर्घकालीन सुरक्षा आणि सुकर प्रवासासाठीची सुनिश्चितता यासाठी ही कामं महत्त्वाची आहे. जेव्हा पर्यटकांची संख्या कमी असेल तेव्हा आणि बहुतांशी रात्रीच्या वेळी ही कामं हाती घेण्याचा पर्याय स्थानिक नेत्यांनी विमानतळ प्रशासन अधिकाऱ्यांना दिला आहे.

जम्मू काश्मीरच्या मोठ्या उद्योगांमध्ये पर्यटनाचाही समावेश होतो. इथं स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये या विभागाचं 7 टक्के योगदान असून, हवाई मार्गानं देशाचा हा भाग सहजगत्या महत्त्वाच्या शहरांशी जोडला जातो. पण, हा मार्गच बंद केला तर येत्या काळात इथं मोठा फरक पडेल अशी चिंता स्थानिक नेत्यांनी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें