महाराष्ट्रासह देशभरात हवामानाची विविध रुपं एकाच वेळी पाहायला मिळत असल्यामुळं सध्या ऋतूचक्र ही संकल्पनाच नाहीशी झाली की काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. मागील 48 तासांचा आढावा घ्यायचा झाल्यास राज्यात प्रामुख्यानं मराठवाडा आणि कोकणात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तळकोकणात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलं. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं. वादळी वा-यामुळे घरांचे छप्पर उडून गेले. तसंच आंबा, काजूची झाडं उन्मळून पडली.
दरम्यानच्या काळात मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील काही भाग, आणि कोकणातील मध्यवर्ती भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान हैराण करताना दिसेल. मुंबई शहरासह नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये उष्मा अधिक तीव्र होत असून, त्यामुळं नागरिकांना नाईलाजानं घरात थांबावं लागत आहे. हे भीषण चित्र पाहता आरोग्य जपण्याचा इशारासुद्धा यंत्रणा देत आहेत.
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा प्रभावित
देशाच्या उत्तरेकडेसुद्धा सातत्यानं हवामान बदल होत असून, उत्तराखंडमधील चारधाम यात्रेवर याचे परिणाम होताना दिसत आहेत. जिथं राज्य प्रशासनानं पर्यटक आणि यात्रेकरुंना हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवासाचे बेत आखण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय संकटसमयी आहात तिथं सुरक्षित राहण्याच्या सूचनासुद्धा केल्या आहेत. पुढील 48 तासांमध्ये उत्तराखंडमधील पर्वतीय भागांमध्ये वातावरण बिघडणार असून, पावसाच्या माऱ्याची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार 11 मे रोजी देशाच्या विविध राज्यांमध्ये तितक्याच बहुविध पद्धतीची हवामानाची रुपं पाहायला मिळतील. ज्यामध्ये उत्तर भारतातील राज्यांसह पूर्वोत्तर भारतात पाऊस आणि वादळाचा इशारा आहे. तर, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशचा पश्चिमेकडील भाग इथं उष्णतेच्या लाटेसम परिस्थिती असेल. दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रामुख्यानं किनारपट्टी क्षेत्रांना पावसाचा मारा सोसावा लागण्याची शक्यता आहे.
मान्सूनचा प्रवास सुरू?
उन्हाचा तडाखा आणि असह्य उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच आता मान्सून कधी दाखल होतो याचीच उत्सुकता अनेकांना लागली आहे. यंदा अंदमानात मान्सूनचे आगमन निर्धारित वेळेच्या आधीच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेनं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला चालना मिळाली असून तो लवकरच अंदमानात दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळं महाराष्ट्रातही मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे.








