इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनी यांच्यासंदर्भात अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. यादरम्यान मोजतबा खामेनी कोमात असल्याचा सर्वात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्यांचा एक पाय कापण्यात आला असून, प्रकृती नाजूक आहे. ब्रिटीश वृत्तपत्र ‘द सनने’ आपल्या रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे.
‘द सन’चा हा रिपोर्ट अशावेळी आला आहे जेव्हा काही तासांपूर्वी मोजतबा खामेनी याचा पहिला संदेश आला आहे. या संदेशात त्यांना आखाती देशांवर हल्ले कायम राहतील आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहील असं स्पष्ट केलं आहे.
‘द सन’ने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, मोजतबा खामेनी यांची प्रकृती खराब आहे आणि ते कोमात आहेत. ते रुग्णालयात इराणचे आरोग्य आणि शिक्षणमंत्री मोहम्मद रजा जफरगंदी यांच्या देखरेखीखाली आहेत. जफरगंदी इराणमधील टॉप सर्जन्सपैकी आहेत.
रिपोर्टमध्ये नेमका दावा काय?
‘द सन’ने केलेल्या दाव्यानुसार, मोजतबा खामेनी सध्या तहरानमधील सिना युनिव्हर्सिटी रुग्णालयाच्या इंटेसिव्ह केअरमध्ये आहेत. या इमारतीच्या एका भागाला छावणीचं रुप असून, कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये दावा आहे की, त्यांचा एक पाय कापला आहे आणि त्यांच्या पोट, यकृताला गंभीर जखमा झाल्या आहेत.
मोजतबा खामेनी 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यातच जखमी झालेत का, ज्यामध्ये अली खामेनी यांचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुसरीकडे इराणचे सरकारी टीव्ही अँकर मोजतबा खामेनी यांना ‘रमजान का जाबाज’ म्हणजेच जखमी योद्धा म्हणत आहेत.
एका सूत्राने ‘द सन’ला सांगितले, “त्यांचे एक किंवा दोन्ही पाय कापण्यात आले आहेत. त्याचे यकृत अथवा पोटही फुटले आहे. तसेच, ते कदाचित कोमामध्येही असावेत.” या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, दोन दिवसांपूर्वी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी गुप्तपणे मोजतबा खामेनी यांची भेट घेतली. सिना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) केवळ मोजक्याच, अधिकृत व्यक्तींना प्रवेश करण्याची परवानगी आहे.
दाव्यात तथ्य किती?
28 फेब्रुवारी रोजी अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष सुरु झाल्यापासून एकदाही मोजतबा खामेनी सार्वजनिकरीत्या समोर आलेले नाहीत. खामेनी यांच्या निधनानंतर एका आठवड्याने 8 मार्चला मोजतबा खामेनी यांची इराणचे नवीन ‘सर्वोच्च नेते’ (Supreme Leader) म्हणून निवड करण्यात आली. त्याच दिवशी, इराणच्या प्रसारमाध्यमांनी मोजतबा खामेनी राष्ट्राला संबोधित करतील, असं वृत्त दिले होतं. पण तसं काहीच घडलं नाही.
सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्यानंतर पाच दिवसांनी, मोजतबा खामेनी यांचा पहिला संदेश जगासमोर प्रसिद्ध करण्यात आला. पण हा संदेश त्यांनी नाही तर टीव्ही अँकरने वाचून दाखवला. यावेळीही ते जगासमोर आले नाहीत.
इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवरील अँकरनी मोजतबा खामेनी यांचा उल्लेख “रमजान युद्धातील शूरवीर” किंवा “जखमी योद्धा” असा केला. मात्र, 28 फेब्रुवारी रोजी मोजतबा यांना खरोखरच दुखापत झाली होती की नाही, याला त्यांनी दुजोरा दिला नाही.
यामुळे मोजतबा खामेनी यांच्यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात असून, काही अफवाही आहेत. मात्र यासंदर्भात अधिकृतपणे काही माहिती देण्यात आलेली नाही.









