होळी आणि शिमग्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने 186 विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 94 होळी विशेष ट्रेन आणि 92 नियमित विशेष ट्रेनचा समावेश आहे. विशेष ट्रेन मुंबई-नागपूर, सावंतवाडी रोड, बनारस, गोरखपूर, समस्तीपूर, दानापूर तसेच पुणे-नागपूर, हजरत निजामुद्दीन व दानापूर या मार्गावर धावणार आहेत.
18 फेब्रुवारीपासून सुरु होणार बुकिंग :
विशेष ट्रेनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर आठवड्यातून दोनदा, सीएसएमटी-सावंतवाडी रोड साप्ताहिक ट्रेन, सीएसएमटी-गोरखपूर दैनंदिन ट्रेन, लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड व बनारस विशेष ट्रेन, तसेच समस्तीपूर व दानापूर मार्गावरील सेवांचा समावेश आहे. नागपूर, पुणे-दानापूर, पुणे-गोरखपूर, पुणे-गाझीपूर सिटी आणि पुणे-हजरत निजामुद्दीन मार्गावरही अतिरिक्त गाड्या धावणार आहेत. विशेष गाड्यांचे आरक्षण बुधवार 18 फेब्रुवारीपासून आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू होणार आहे. आरक्षित नसलेल्या डब्यांसाठी तिकीट बुकिंग युटीएस प्रणालीद्वारे तसेच रेल वन अॅपद्वारे करता येईल. प्रवाशांनी वेळापत्रक व थांबे यांची सविस्तर माहिती संकेतस्थळार उपलब्ध आहे.
कोकण रेल्वे मार्गावर 8 खास फेऱ्या :
मध्य रेल्वेने मुंबई-सावंतवाडी रोड दरम्यान एकूण 8 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रत्येकी दोन फेऱ्या (दोन्ही बाजूंसह) चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी रोड विशेष (०११७१/०११७२) ही गाडी मुंबई सीएसएमटीहून 26 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी गुरुवारी मध्यरात्री 12: 20 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 12: 30 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ती सावंतवाडी रोडहून त्याच दिवशी सांयकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3: 45 वाजता सीएसएमटीला येईल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आदी स्थानकांवर थांबे असतील. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस सावंतवाडी रोड (०१११९/०११२०) ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून 26 फेब्रुवारी व 5 मार्च रोजी रात्री 10: 15 वाजता सुटेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी 9: 30 वाजता ती सावंतवाडी रोडला पोहोचेल. परतीची गाडी 27 फेब्रुवारी आणि 6 मार्च रोजी सावंतवाडी रोडहून सांयकाळी 5: 20 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4: 05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनलला पोहोचेल असे कोकण रेल्वेने कळविले आहे.








