राज्यातील सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाराचाराचे लोण आता मंत्रालयापर्यंत पोहोचलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रात्री थेट मंत्रालयात छापा टाकला. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये एसीबीने छापा टाकून कारवाई केली आहे. यावेळी त्यांनी लाच घेताना रंगेहाथ पकडत दोघांना ताब्यात घेतलं. तसंच कार्यालय सील करण्यात आलं आहे. यानंतर एकच खळबळ उडाली.
मंत्रालयातील लाचखोर क्लर्क एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे. त्याला 35 हजारांची रोख घेताना अटक करण्यात आली आहे. परवाना निलंबन रद्द करण्यासाठी त्याने 50 हजारांची मागणी केली होती.
नेमकं काय झालं?
मुंबईत मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अन्न व औषध प्रशासन विभागातील कारकून राजेंद्र ढेरंगेला 35 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं आहे. झालं असं की, लातूरमधील एका औषध दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला होता. रद्द परवाना नूतनीकरण करण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या मंत्र्यांना असतात. त्यासंदर्भात सुनावणी घेऊन निर्णय घेतले जातात.
मेडिकल परवाना निलंबन रद्द करण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक आलोसो राजेंद्र ढेरंग याने एका नागरिकाकडे लाच मागितली होती. त्याने 50 हजारांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.
पडताळणीत ढेरंगेने लाच मागितल्याचं स्पष्ट झालं. यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आला. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता तडजोडीअंती ढेरंगे तक्रारदाराकडून 35 हजार रुपये घेण्यास तयार झाला. अखेर, 35 हजाराची लाच घेताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढेरंग याच्यासह कार्यालयातील आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. आपण झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यानुसार घेतली असा दावा त्याने केला आहे. खासगी सचिव हे मंत्री कार्यालयाचे प्रमुख असतात. त्यामुळे नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.








