Search
Close this search box.

32 तासांच्या ट्रॅफिक जॅमनंतर प्रशासनाला जागा! Mumbai-Pune Expressway ने प्रवास करणाऱ्यांना दिलासा; फडणवीसांनी…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. वाहतुककोंडीमुळे या मार्गावर प्रवास करायचा म्हटलं तरी मुंबई, पुण्याच्या लोकांच्या अंगावर काटा येतो. घरुन निघाल्यावर रस्ते मार्गाने आपण नेमके किती वाजता निश्चित ठिकाणी या मार्गावरुन पोहचू हे कोणालाच सांगता येणार नाही इतकी वाईट अवस्था येथे झाल्याचं मुंबई आणि पुणेकरांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावरही यासंदर्भात बरीच चर्चा दिसून येते. त्यातच आठवड्याभरापूर्वी या मार्गावर एक गॅस टँकर कोसळल्याने तब्बल 32 तास दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद होती आणि त्यामुळे जवळपास 60 किलोमीटरपर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या. याच घटनेवरुन आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

काय निर्णय घेण्यात आला?

आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी बोरघाटात मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या (एचएसपी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

32 तास वाहतुककोंडी

या महामार्गावर 3 फेब्रुवारी रोजी टैंकर उलटून सुमारे 32 तासांपेक्षा जास्त काळासाठी महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. आपत्कालीन यंत्रणेला घटनास्थळी पोहचण्यास वाहतूककोंडीमुळे विलंब लागला. प्रशासकीय व्यवस्थापनातील अभाव समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना ‘एमएसआरडीसी’ आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला दिल्या.

18 ते 20 किलोमीटर लांबीचा घाट

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनेनुसार ‘एमएसआरडीसी’ आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या बैठकीत बोरघाट येथे कायमस्वरूपी मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बोरघाट परिसर हा खंडाळा ते खोपोलीदरम्यान सुमारे 18 ते 20 किलोमीटर लांबीचा आहे. या मदत केंद्रात अवजड वाहने स्थलांतरित करण्यासाठी ‘क्रेन’, अग्निप्रतिबंधात्मक यंत्रणा, रुग्णवाहिका, गस्तीसाठी वाहने, पाण्याचा टँकर, कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या केंद्रामुळे बोरघाटामध्ये 3 फेब्रुवारीसारखी परिस्थिती निर्माण झाली तरी तातडीने त्यावर तोडगा काढता येणार आहे.

बोरघाटात वाहतुककोंडी का होते?

बोरघाटात तीव्र उतार, वळणे आणि बोगदे असल्यामुळे वाहने विशेषतः जड वाहने हळू चालतात. यामुळे एका ट्रक बंद पडला तरी वाहतूक मंदावते. लोणावळा आणि खंडाळ्यासारख्या पर्यटन स्थळांमुळे या ठिकाणी अतिरिक्त गर्दी होते.  मुंबई आणि पुणे दरम्यानचा हाच एक मुख्य मार्ग असल्याने दररोज लाखो वाहने या मार्गावरुन धावतात. विकेंड, सुट्ट्या, निवडणुका किंवा सणासुदींमध्ये या मार्गावर प्रचंड वाहतुककोंडी होते. 3 फेब्रुवारीला झाला त्याप्रमाणे एखाद्या इंधन टँकर किंवा धोकादायक रसायन वाहणाऱ्या वाहनाचा अपघात झाला तरी वाहनं अडकून पडतात. ज्यामुळे सुरक्षेसाठी रस्ता पूर्ण बंद करावा लागतो. 3 तारखेला असाच  प्रोपिलीन गॅस टँकर अपघातामुळे 32 तास वाहतूक खोळंबली होती. पर्यायी मार्ग नसल्यामुळे कोंडी झाल्यास वाहने एकाच ठिकाणी अडकतात आणि जुना हायवेही जॅम होतो.

admin
Author: admin

और पढ़ें