बीड (Beed) जिल्ह्यातील केज (Kej) तालुक्यातील एका माजी सरपंचाने आणि कृषी पंप व्यापाऱ्याने तामिळनाडू राज्यात बनावट नोटा (Fake Notes) चलनात आणण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुवाकुडी पोलिसांनी (Police) या दोघांना अटक करत तब्बल 8 लाख 37 हजार 800 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पुढील तपास आता तामिळनाडू गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे.
Beed Crime News: पेट्रोल पंपावर ‘असा’ झाला भांडाफोड
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये केज तालुक्यातील माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे आणि मूळचा राजस्थानचा असलेला कृषी पंप व्यापारी नारायण राम पटेल यांचा समावेश आहे. हे दोघे त्यांच्या खाजगी कारने तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले होते. बुधवारी तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर इंधन भरताना त्यांनी 200 रुपयांच्या काही नोटा दिल्या. आरोपी निघून गेल्यानंतर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला नोटांचा कागद व स्पर्श संशयास्पद वाटला. सतर्कता दाखवत त्याने तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली.
Beed Crime News: चेकपोस्टवर कार अडवली, कारवाईत मोठा खुलासा
पोलिसांनी माहिती मिळताच मंजाथिदल चेकपोस्टवर सापळा रचत संबंधित कार अडवली. कारची झडती घेतल्यानंतर पोलिस अधिकारीही थक्क झाले. कारमध्ये 200 रुपयांच्या नोटांचे तब्बल 41 बंडल लपवून ठेवलेले आढळून आले. तपासात या सर्व नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले, ज्यांची एकूण रक्कम 8 लाख 37 हजार 800 रुपये इतकी आहे.
Beed Crime News: इतर शहरांतही बनावट नोटा चलनात
पोलिस तपासादरम्यान आरोपींनी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर परिसरात यापूर्वीही अनेक बनावट नोटा चलनात आणल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका घटनेपुरते मर्यादित नसून, मोठ्या रॅकेटचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Beed Crime News: रॅकेटमागील सूत्रधार कोण?
या बनावट नोटा आरोपींना कोणी पुरवल्या? या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे? आणि तामिळनाडूमध्ये त्यांना कोणाचा आश्रय मिळत होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता गुप्त वार्ता विभाग आणि CID कडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात केज तालुक्यातील माजी सरपंचाचा सहभाग उघड झाल्याने, बीड जिल्ह्यासह स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.








