अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ती भरुन काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अजित पवार यांच्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विराजमान होण्याची शक्यता असून, तशी तयारी सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पक्षाच्या वतीने सूनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आल्याचं समजत आहे.
छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलं?
“दादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले त्यामुळे सर्वांची झोप उडाल्यासारखं झालं आहे. आता कोणाकडे तरी सर्व जबाबदारी देऊन पक्ष किंवा सरकार चालवावं तर लागणार आहे. विधीमंडळाच्या सदस्यांची उद्या बैठक बोलावली आहे. त्याच्यात विधिमंडळ पक्षनेतेपद जे अजित पवारांकडे होतं ते देण्यासंदर्भात निर्णय होईल. सुनेत्राताईंकडे पद द्यावं अशी अनेकांची मागणी आहे आणि ते चूक आहे असं वाटत नाही. पण निर्णय बैठकीत होईल,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.
‘उद्याच शपथविधीही होऊ शकतो’
अजित पवार राष्ट्रवादीसंदर्भातील कामांवर आम्ही लक्ष देत आहोत सांगताना त्यांनी आपल्याला 14 बैठका झाल्याची काही कल्पना नसल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “उपमुख्यमंत्रीपदाची जागा रिकामी आहे ती, सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून कशी भरता येईल याकडे लक्ष आहे. पक्ष ठरवेल त्याप्रमाणे निर्णय होईल. उद्या विधिमंडळ पक्षनेता ठरवला जाईल आणि कदाचित एकमत झालं आणि प्रक्रिया झाली तर उद्याच शपथविधीही होऊ शकतो”.
उद्या वेगवान घडामोडी
उद्या म्हणजेच शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीत सूनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवडीचे पत्र दिले जाणार आहे.
ही निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. या शपथविधीसाठी कोणतीही जय्यत तयारी केली जाणार नाही, अत्यंत साधेपणाने तो पार पडेल. या शपथविधीनंतर सूनेत्रा पवारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल. यासह राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळतील.








