भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माने युवराज सिंगचा टी-20 क्रिकेटमधील 12 चेंडूंमध्ये अर्थशतक झळकावण्याच्या विक्रमाबद्दल भाष्य केलं आहे. अभिषेकने स्वत: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये अवघ्या 14 चेंडूंमध्ये भारतात सर्वात जलद अर्थशतक झळकावणारा खेळाडू होण्याचा मान पटकावल्यानंतर युवराजच्या विक्रमकाबद्दल भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे युवराज हाच अभिषेकचा बॅटिंगचे धडे देतो. त्यामुळे आपल्याचा गुरुबद्दल अभिषेक काय म्हणालाय ते पाहूयात…
सामन्यात घडलं काय?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-20 सामना रविवारी खेळवण्यात आला. गुवाहाटी येथील बारासापारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 154 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने फक्त 10 षटकांत पूर्ण केले. 154 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मॅट हेन्रीने त्याची विकेट घेतली. मात्र, त्यानंतर इशान किशन फॉर्ममध्ये होता. त्याने 13 चेंडूत 28 धावा केल्या, त्यात तीन चौकार आणि दोन षटकार मारले. चौथ्या षटकात किशनची विकेट पडली, परंतु तोपर्यंत टीम इंडियाचा स्कोअर 50 च्या पुढे गेला होता.
किशन बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने वादळी खेळी केली. त्याने 14 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सातव्या षटकात भारताची धावसंख्या 100 च्या पुढे गेली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने फक्त 25 चेंडूत अर्धशतक ठोकले आणि अवघ्या 10 षटकात भारताचा विजय निश्चित केला. सूर्याने 26 चेंडूत नाबाद 57 धावा केल्या, तर अभिषेकने 20 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. त्याने सात चौकार आणि पाच षटकार मारले. सूर्याने सहा चौकार आणि तीन षटकारही मारले. भारतीय संघाने हा सामना आठ विकेट्सने जिंकला. यासह भारताने मालिकाही खिशात घातली. भारतीय संघाने पहिले दोन टी-20 सामने जिंकले होते. आता मालिकेत 3-0 ची अभेद्य आघाडी मिळवली आहे.
अभिषेक चमकला
अभिषेकने सुरुवातीपासूनच धडाकेबाज फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्याने नेहमीप्रमाणे आक्रमक फलंदाजी करत पाच चौकार आणि नऊ षटकारांच्या मदतीने केवळ 14 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने केलेले हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. तसंच या फॉरमॅटमध्ये एखाद्या भारतीयाने केलेले हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक देखील आहे.
युवराजची पोस्ट
अभिषेकने वेगवान अर्थशतक झळकावल्यानंतर युवराज सिंगनेही आपल्या अधिकृत एक्स हॅण्डवलवरुन एक पोस्ट केली. “तरीही 12 चेंडूंमध्ये 50 धावा करता आल्या नाहीत, तुला हे करता येईल का? चांगला खेळलास… अशाच दमदार खेळी करत राहा,” असं युवराजने अभिषेक अर्थशतक साजरा करत असल्याच्या फोटो पोस्ट करत म्हटलं आहे.
युवराजच्या विक्रमाबद्दल काय म्हणाला अभिषेक?
“माझ्या टीमला माझ्याकडून अशाच खेळीची अपेक्षा आहे आणि प्रत्येक वेळी मी ती इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी व्हावं अशी माझी इच्छा आहे,” असं अभिषेकने म्हटलं आहे. युवराजचा 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मोडणं कोणालाही अशक्यच आहे, असं अभिषेकने म्हटलं आहे. “तो विक्रम मोडणे कोणासाठीही अशक्यच आहे,” असं अभिषेक म्हणाला आहे.
युवराजने कधी केलेली विक्रमी कामगिरी?
युवराजने 2007 साली डर्बनमध्ये इंग्लंडविरुद्ध सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावत 12 चेंडूंमध्ये अर्थशतक झळकावलं होतं. हा विक्रम आज 18 वर्षानंतरही कोणीही मोडू शकलेलं नाही. हा विक्रम कोणी मोडू शकणार नाही असं म्हणत अभिषेकने त्याच्या गुरुचं कौतुक केलं आहे.









