मागील महिन्याभरापासून मोठ्या पडद्यावर आणि तिकीटबारीवर धुमाकूळ घालत असलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटातील एका अभिनेत्याला लैंगिक छळ प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून जवळपास मागील 10 वर्षांपासून घरी काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप या अभिनेत्यावर ठेवण्यात आला आहे. ‘मिड-डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणामध्ये मलावणी पोलिसांनी या अभिनेत्याला गुरुवारी ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हा अभिनेता कोण? नेमकं घडलं काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडिता ही 41 वर्षांची असून तिने अभिनेता नदीम खानविरोधात तक्रार दाखल केली आहे. मागील अनेक वर्षांपासून ती घरकाम करते. नदीम खानच्या घरी काम करण्यापूर्वी तिने अनेक कलाकारांकडे काम केलेलं आहे. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये, अभिनेत्याने तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचं म्हटलं आहे. तक्रारदार महिलेने, नदीम खानने मला लग्नाचं वचन दिलं होतं असा दावा केला आहे. लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. मात्र नंतर नदीम खानने लग्न करण्यास नकार दिला. पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबामध्ये पीडितेने, तिची आणि नदीम खानची भेट 2015 मध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमधील जवळीक वाढली.
स्वत:च्या घरी आणि अभिनेत्याच्या घरी ठेवले शरीरसंबंध
पीडितेने केलेल्या आरोपांनुसार, लग्नाचं आश्वासन दिल्यानंतर आरोपी नदीम खानने तिच्या राहत्या घराबरोबरच मुंबईमधील वर्सोव्यातील त्याच्या स्वत:च्या निवासस्थानी अनेकदा शरीरसंबंध ठेवले. आपण लवकरच लग्न करु असं सांगून तो वारंवार तिच्याशी शरीरसंबंध ठेवत होता. पीडित महिलेने आरोप केला आहे की, खान तिच्याशी लग्न करेल या विश्वासावर तिने जवळपास 10 वर्षे त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
कुठे दाखल झाला गुन्हा?
मात्र, जेव्हा नदीम खानने लग्न करण्यास नकार दिला, तेव्हा तिने वर्सोवा पोलिसांशी संपर्क साधून जानेवारीच्या सुरुवातीला तक्रार दाखल केली. “आरोपीसोबतचे शारीरिक संबंध [प्रथम] तक्रारदार महिलेच्या घरी प्रस्थापित केले. हे घर मालवणी पोलिसांच्या हद्दीत येते, घडल्याने वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणामध्ये झिरो एफआयआर अंतर्गत मालवणी पोलिसांकडे वर्ग केला,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
‘धुरंधर’ चित्रपटात कोणती भूमिका साकारली होती
‘धुरंधर’ चित्रपटात खानने अखलाक ही भूमिका साकारली होती. छोट्याश्या भूमिकेमध्येही त्याने आपल्या अभिनयाचा छाप सोडली होती. अखळाख हा दरोडेखोर रहमानचा (अक्षय खन्ना) आचारी असल्याचं दाखवण्यात आलं आहे.









