भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कर्तव्यपथावर एकूण 17 राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर सरकारच्या विविध विभागांचे असे एकूण 30 चित्ररथ पाहायला मिळणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथात गणेशोत्सवाचं सादरीकरण करण्यात आलं आहे. हा चित्ररथ केवळ सांस्कृतिक वैभवच नाही, तर गणेशोत्सवाच्या माध्यमातून मिळणारी आर्थिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक ‘आत्मनिर्भरता’ अधोरेखित करतो.
चित्ररथाच्या दोन्ही बाजूंना पारंपरिक वेशभूषेतील महिला आणि पुरुषांचे लेझीम पथक आणि ढोल-ताशांचा गजर होता, ज्यामुळे कर्तव्यपथावर ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष घुमला. ऐतिहासिक वारसा: १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा, एकता आणि भक्तीचा संदेश या माध्यमातून जगासमोर मांडण्यात आला. पर्यावरण पूरक संदेश: चित्ररथात पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींच्या निर्मितीवर भर देऊन शाश्वत परंपरेचा संदेश देण्यात आला आहे. महाराष्ट्राचा हा चित्ररथ सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे तयार करण्यात आला असून, त्याने महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवले.
यांचा देखील सहभाग
यंदाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासह आसाम, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, जम्मू-काश्मीर, मणिपूर, नागालँड, ओडिशा, पुदुच्चेरी, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश यांचा समावेश होता. तसेच हवाई दल मुख्यालय, नौदल मुख्यालय, आयुष मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, गृह मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आदी केंद्र सरकारच्या विभागांचे चित्ररथही या संचलनात सहभागी झाले होते.









