दरवर्षी भारतात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दिवस अगदी जल्लोषात साजरे केले जातात. देशासाठी या दोन्ही तारखांचे मोठे महत्त्व आहे. या दिवशी आपल्या भारत देशाचा झेंडा अभिमानाने फडकवला जातो. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनादिवशी झेंडा फडकवण्याचा मान देशाच्या पंतप्रधानांना दिला जातो. तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशी देशाच्या राष्ट्रपतींना हा मान दिला जातो. पण असे का? असा विचार तुम्ही कधी केला आहे का? यामागे एक फारच रंजक आणि संविधानिक कारण आहे.
संविधानातील काही तरतुदी जाणून घ्या
यामागचे कारण जाणून घेण्याआधी सर्वप्रथम संविधानातील काही तरतुदी माहित असणे आवश्यक आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. त्यावेळी देशाचे संविधान लागू केले गेले नव्हते. देशाचे प्रधानमंत्री सरकारचे प्रमुख असतात, यावेळी स्वतंत्र दिनाचा उत्सव साजरा करताना त्यांनीच झेंडा फडकवला. जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपती नाही तर, लॉर्ड माउंटबेटन गवर्नर जनरल होते. म्हणूनच त्यावेळचे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी झेंडा फडकवला.
प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती झेंडा का फडकवतात?
यानंतर 1950 मध्ये जेव्हा भारताचे संविधान लागू केले गेले. तेव्हा डॉ. राजेंद्र प्रसाद देशाचे पहिले राष्ट्रपती बनले. आणि त्यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तिरंगा फडकवला. राष्ट्रपती देशाचे संविधानिक प्रमुख असतात आणि ते देशाचे प्रथम नागरिक मानले जातात. प्रजासत्ताक दिन म्हणजे देशावर संविधान लागू झाल्याचा उत्सव आहे. म्हणूनच यादिवशी तिरंगा फडकवण्याचा मान देशाच्या राष्ट्रपतींना दिला जातो.
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान लागू झाल्यानंतर 1950 पासून 1962 पर्यंत राष्ट्रपती पदावर राहिले. ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचे नेते होते. तसेच ते भारताचे पहिले आणि एकमेव दोनदा निवडून आलेले राष्ट्रपती आहेत. सध्याच्या काळात या राष्ट्रपती पदाचा कारभार द्रौपदी मुर्मू संभाळत आहेत. या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती आहेत.
हे ही जाणून घ्या:
भारताच्या राष्ट्रपतींती क्रमानुसार यादी:
1. डॉ. राजेंद्र प्रसाद
2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
3. डॉ. झाकीर हुसेन
4. व्ही. व्ही. गिरी
5. फखरुद्दीन अली अहमद
6. नीलम संजीव रेड्डी
7. ज्ञानी जैल सिंह
8. आर. वेंकटरमन
9. डॉ. शंकर दयाल शर्मा
10. के. आर. नारायण
11. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
12. प्रतिभा पाटील
13. प्रणब मुखर्जी
14. रामनाथ कोविंद
15. द्रौपदी मुर्मू









