जानेवारी महिन्याची वाटचाल अखेरच्या टप्प्याच्या दिशेनं सुरू झालेली असतानाच देशाच्या आणि राज्याच्या हवामानात काही महत्त्वपूर्ण बदल घडताना दिसत आहेत. सध्या देशाची राजधानी दिल्ली आणि त्यासह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये शीतलहर सक्रिय झाली असून, पर्वतीय राज्यांमध्ये हिमवर्षाव पाहायला मिळत आहे. एकिकडे या राज्यांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांमध्ये उत्साही वातावरण असलं तरीही थंडीचा हा कडाका सोसवणार नाही इतका वाढण्याचा अंदाज असल्यानं अनेकांनाच धडकीसुद्धा भरत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये हवामानात सातत्यपूर्ण बदल पाहायला मिळणार असून, विविध राज्यांमध्ये हवामान विविध तालरंगांमध्ये दिसून येईल. महाराष्ट्रापासून दक्षिण भारतापर्यंत याचे परिणाम पाहायला मिळणार आहेत.
महाराष्ट्रात वारं फिरलं… थंडी वाढणार- ऊनही पडणार!
हवामान विभागानं महाराष्ट्रासाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ अपेक्षित असून दुपारच्या वेळी या भागांमध्ये ऊन्हाचा तडाखा वाढण्याचा अंदाज आहे. तर, उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल असा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये दिवसा बोचणारी सूर्यकिरणं आणि रात्रीसह पहाटे गारठा असं चित्र पाहायला मिळेल. तर, पश्चिम महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी धुकं , दुपारच्या वेळी सूर्यकिरणांचा दाह आणि रात्री गार वारे अशीच स्थिती प्रामुख्यानं घाट क्षेत्रांमध्ये पाहायला मिळेल.
मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका जाणवरणार असून, आकाश निरभ्र असेल. इथं सरासरी कमाल तापमान 30 अंश आणि किमान सरासरी तापमान 10 ते 15 अंशांदरम्यान असेल असा अंदाज आहे. प्रामुख्यानं नागपूर, चंद्रपूर आणि गोंदियामध्ये पारा 10 अंशांच्याही खाली घसरू शकतो. त्यामुळं हवामानाचा एक वेगळाच प्रयोग राज्यात पाहायला मिळणार आहे, जिथं ढगाळ वातावरणासह थंडी आणि ऊन अशी तिहेरी स्थिती दिसून येईल.
एकाएकी का वाढला थंडीचा कडाका?
आयएमडीच्या निरीक्षणानुसरा अफगाणिस्तान आणि त्यानजीक असणाऱ्या पाकिस्तान क्षेत्रातून एक पश्चिमी झंझावात नव्यानं सक्रिय होत असून, येत्या काळात तो चक्रीवादळाचं रुप धारण करू शकतो. परिणामी थंडीत चढ उतार आणि पुढील 48 तासांमध्ये दिल्लीसह उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे.









