मध्य रेल्वेकडून आज रात्री दोन विशेष ट्रेन सोडल्या जाणाऱ्या आहेत. यापैकी एक ट्रेन मुख्य मार्गावरुन रात्री अडीच वाजता तर दुसरी रात्री 2 वाजून 25 मिनिटांनी हार्बर मार्गावरुन सोडण्यात येणार आहेत. या दोन्ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सोडल्या जाणार आहेत. अचानक या ट्रेन सोडण्यामागे एक अत्यंत रंजक कारण आहे. याबद्दलच जाणून घेऊयात…
कधी सोडल्या जाणार या गाड्या?
मध्य रेल्वेकडून आज म्हणजेच 17 जानेवारी आणि 18 जानेवारीच्या मध्यरात्री (शनिवार-रविवारच्या मध्यरात्री) या दोन ट्रेन सोडल्या जाणार आहेत. या ट्रेनने हजारो लोक प्रवास करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ट्रेन का? कोणासाठी सोडल्या जाणार आहेत?
कोणासाठी सोडणार या गाड्या?
मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ही विशेष गाडी मुख्य मार्गावर धावणार असून दुसरी हार्बर मार्गावर धावणार आहे. या गाड्या टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी सोडल्या जाणार आहेत. मुंबई उपगनरांमधून मॅरेथॉन धावपटूंना पहाटे लवकर पोहोचावं लागतं. यासाठीच ही विशेष सेवा सुरु करण्यात आली आहे. हे प्रसिद्धीपत्रक 16 जानेवारी 2026 रोजी, पीआर क्रमांक 2026/01/15 अंतर्गत मुंबई विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांच्या सही शिक्क्याने जारी करण्यात आले.
कल्याण-सीएसएमटी विशेष गाडीचा तपशील
मुख्य मार्गावरील विशेष उपनगरीय सेवेअंतर्गत ट्रेन कल्याणहून पहाटे अडीच वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे पहाटे 4 वाजता पोहोचेल. ही गाडी मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबेल, ज्यामुळे अनेक उपनगरीय स्टेशन्सवरुन स्पर्धांना या ट्रेनचा सोयीस्करपणे लाभ घेता येईल.
हार्बर मार्गावर पनवेल-सीएसएमटी विशेष गाडी
हार्बर मार्गावर, विशेष गाडी पनवेलहून पहाटे 2.25 वाजता सुटेल. ही ट्रेन सीएसएमटी येथे पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल. मुख्य मार्गावरील सेवेप्रमाणेच, ही गाडी देखील हार्बर मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबेल, ज्यामुळे संपूर्ण हार्बर कॉरिडॉरमधील स्थानकांवरुन स्पर्धकांना मुंबईत पोहचता येणार आहे.
विशेष सेवा वापरण्याचे आवाहन
मध्य रेल्वेने प्रवाशांना, विशेषतः मॅरेथॉन धावणाऱ्या स्पर्धकांना या विशेष व्यवस्थेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. मागील वर्षी, अशा विशेष सेवांच्या माध्यमातून हजारो धावपटू वेळेवर आणि तणावमुक्त प्रवास करत स्पर्धेच्या ठिकाणी अगदी वेळेत पोहोचले होते.









