मुंबई महानगरपालिकेच्या निकालामध्ये महायुतीने बाजी मारली आहे. भारतीय जनता पार्टी 88 जागांसहीत सर्वात मोठा पक्ष ठरला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 26 जागांवर विजय मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फारशा जागा मिळणार नाही अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली. मात्र ठाकरेंच्या युतीने अगदीच निराशाजनक कामगिरी केलेली नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षाने 69 जागा जिंकल्या असून अनेक ठिकाणी त्यांनी सत्ताधाऱ्यांना तगडं आव्हान दिलं. विशेष म्हणजे मुंबईमधील मराठी पट्ट्यात ठाकरे बंधूंचाच दबदबा असल्याचं दिसून आलं. दादर, माहिम, लालबाग-परळसारख्या भागांमध्ये मतदारांनी भाजपा आणि शिंदेंकडे पाठ फिरवत ठाकरे बंधूंच्या पारड्यात आपली मतं टाकली. याचसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात…
मराठीचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला?
रात्री पत्रकार परिषदेला संबोधित करताना शिंदेंनी महापौर हा महायुतीचाच बसेल असं सांगितलं. तसेच ठाकरे बंधूंच्या भावनिक राजकारणाला नाकारुन लोकांनी महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मुंबईतून पाठिंबा दिल्यानेच हा निकाल लागला असल्याचं शिंदे म्हणाले. यावेळेस एका पत्रकारने शिंदेंना, “मराठीचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला, इमोशनला कार्ड चाललं असं एकंदरित निकालाकडे पाहिल्यास दिसून येतं,” असं म्हणत प्रश्न विचारला. दादर, महिम, लालबाग-परळ भागामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या शिलेदारांनीच गुलाल उधळला असून त्याचा पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारण्यात आला होता. मराठी माणूस ठाकरेंच्या पाठीशी उभं राहिल्याचं मराठीबहुल परिसरामध्ये दिसून आलं या प्रश्नाला उत्तर देताना शिंदेंनी, “मुंबईकरांचा कौल आम्ही मान्य केलाय. मतदारांचा कौल मान्य करणारे आम्ही आहोत. जिथे ज्या पद्धतीने यश मिळालंय ते मोठं यश आहे. 20-25 वर्ष ज्यांनी कारभार केला त्यांच्या कारभारावर लोकांनी मतदानातून नाराजी व्यक्त केलीच ना? शिवसेना आणि भाजपाला बहुमत दिलेच ना?” असा प्रतीप्रश्न केला.
मतदारांनी भावनिकतेपेक्षा विकासालाच कौल दिला असून…
दरम्यान, आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन एकनाथ शिंदेंनी एक खास पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी, “मुंबईसह राज्यातील मतदारांनी भावनिकतेपेक्षा विकासालाच कौल दिला असून विकासविरोधी भूमिका घेणाऱ्यांना जनतेने नाकारले आहे. विकास हाच ब्रँड जनतेने स्वीकारला आहे. महायुतीला मतदारांनी दिलेला हा कौल अभूतपूर्व असून राज्यातील तमाम मतदार बांधवांचा मी मनापासून ऋणी आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपा महायुती बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, राज्यभरातील अनेक महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील. ठाणे, कल्याण–डोंबिवली, संपूर्ण एमएमआर आणि मुंबईत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. ठाण्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून, एमएमआर परिसरातही चांगल्या जागा मिळाल्या आहेत. मुंबईतही शिवसेना भाजपा महायुतीचा महापौर होईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने 150 हून अधिक जागा लढवून सुमारे 65 जागा जिंकल्या, मात्र जनतेने विकासाचा अजेंडाच स्वीकारला आहे,” असं म्हटलं आहे.
“देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता अशा ट्रिपल इंजिन सरकारचा मुंबईला मोठा फायदा होणार आहे. भारत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असताना, त्या प्रवासात मुंबईचा मोठा वाटा असावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असून मुंबईला जागतिक दर्जाचे, जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला केवळ महापौरपद किंवा सत्तेची खुर्ची महत्त्वाची नाही, तर मुंबईकरांच्या जीवनात बदल घडवायचा आहे. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत परतावा, ही आमची भूमिका आहे. या निकालामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग आहे. शिवसेना आणि भाजपाची विचारधारा एकच असून, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आमचा अजेंडा साधा आणि स्पष्ट आहे. विकास, विकास आणि विकास!!” असं शिंदे म्हणालेत.









