Search
Close this search box.

संदीप देशपांडेंच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांदरम्यान राज ठाकरेंना मोठा धक्का! कट्टर समर्थकाने सोडली साथ, ‘पूर्णपणे हाराकिरी…’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई महापालिका निवडणुकीत आपले बंधू उद्धव ठाकरेंसोबत मैदानात उतरल्याने एकीकडे राज ठाकरेंना राजकीय बळ मिळालं असता, दुसरीकडे पक्षांतर्गत नाराजी वाढताना दिसत आहे. संतोष धुरी, माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांच्यानंतर मनसेला आणखी एक धक्का बसला आहे. मनसेचे शिवडी विधानसभा अध्यक्ष आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे कट्टर समर्थक संतोष नलावडे यांनी पक्षाला “जय महाराष्ट्र” केला आहे. महाराष्ट्र सैनिकांना पत्र लिहीत संतोष नलावडे यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. आमच्या नेत्यांनीच आमचा राजकीय बळी दिला असा आरोप त्यांनी केला आहे.

“माझ्या नेत्यांनी, ज्यांच्यासाठी आम्ही आयुष्य पणाला लावले, त्यांनीच या जागावाटपात पूर्णपणे ‘हाराकीरी’ केली. शिवडी, माहिम, वरळी, कांजुरमार्ग, भांडुप… हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. इथे मनसेचा कडवट, निर्णायक मताधार आहे. मात्र इथेच आम्हाला जागा देण्यात आल्या नाहीत.  नेत्यांनी महाराष्ट्र सैनिकांच्या हक्काचा बळी दिला,” असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

“वटवृक्षाच्या सावलीत आम्ही विसावायचो,  पण आज  तोच वटवृक्ष पक्षातील काही नेते आपल्या स्वार्थासाठी छाटत आहेत. या वटवृक्षाला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे. अशा विषारी झाडाला ना पाने येतात, ना फुले, ना फळे; तिथे पक्षीदेखील बसत नाहीत. जर आमचा आधारच छाटला जात असेल, तर आम्ही उभं राहायचं तरी कुठे?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.

 संतोष नलावडे यांनी महाराष्ट्र सैनिकांना लिहिलेले पत्र…

॥ जय महाराष्ट्र ॥

प्रति,
माझे जिवाभावाचे तमाम सहकारी, निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक, गट अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, विभाग आणि उपविभाग अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि शिवडीतील माझ्या प्रिय बांधवांनो-भगिनींनो,

आज हे पत्र लिहिताना मनात असंख्य वादळे घोंघावत आहेत. विचारांचे वादळ आले आहे. गेले अनेक दिवस मी अस्वस्थ आहे. ज्या भावनेने मी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचा सदस्य झालो. पुढे झपाटून काम केले. त्याच पक्षाने माझ्यावर हे असं पत्र मला लिहायची वेळ आणली आहे. हे मलाच भयानक स्वप्नासारखे वाटते आहे. शाळेत असल्यापासून रक्तात सळसळणारा ‘शिवसैनिक’ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राजसाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलेला हा तुमचा ‘भाऊ’, आज  आयुष्याच्या एका अत्यंत कठीण वळणावर उभा आहे.

गेली २० वर्षे आपण संघटनेसाठी काय नाही केले? राजसाहेबांच्या एका शब्दावर आपण रस्त्यावर उतरलो. मराठी पाट्यांचे आंदोलन असो, टोलचा मुद्दा असो, रेल्वे भरती असो वा भोंग्यांविरोधातील एल्गार… आपण रक्ताचे पाणी केले, घाम गाळला. अंगावर केसेस घेतल्या, तडीपारी भोगली, तुरुंगवास सोसला. पक्षासाठी तन-मन-धन अर्पण केले.घरा-दारावर पाणी सोडले. हे सर्व कशासाठी? फक्त राजसाहेबांच्या एका स्वप्नासाठी की, “महाराष्ट्रातील कोणत्याही आई-बापाला अभिमान वाटेल की माझा मुलगा मनसेमध्ये आहे.” हे सन्माननिय राजसाहेबांचे वाक्य सत्यात उतरवण्यासाठीच. राजसाहेबांनी त्यांच्या विचारांनी जो पक्ष फुलवला, आपल्यासारख्या निष्ठावंतांनी रक्त सांडून त्याचा वटवृक्ष केला. त्या वटवृक्षाच्या सावलीत आम्ही विसावायचो,  पण आज अत्यंत वेदनेने सांगावे लागते की, तोच वटवृक्ष पक्षातील काही नेते आपल्या स्वार्थासाठी छाटत आहेत. या वटवृक्षाला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे. अशा विषारी झाडाला ना पाने येतात, ना फुले, ना फळे; तिथे पक्षीदेखील बसत नाहीत. जर आमचा आधारच छाटला जात असेल, तर आम्ही उभं राहायचं तरी कुठे?

शिवसेना (उबाठा) आणि मनसेची युती झाली, दोन भाऊ एकत्र आले, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्हीही त्याच विचारांचे पाईक आहोत. पण या युतीच्या जागावाटपात जे घडले, त्याला काय म्हणावे? माझ्या नेत्यांनी, ज्यांच्यासाठी आम्ही आयुष्य पणाला लावले, त्यांनीच या जागावाटपात पूर्णपणे ‘हाराकीरी’ केली! हो, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय – ‘हाराकीरी’. ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या अस्तित्वावर केलेली जखम आहे.

शिवडी, माहिम, वरळी, कांजुरमार्ग, भांडुप… हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. इथे मनसेचा कडवट, निर्णायक मताधार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जे अपयश आले, त्याचे खापर सर्वस्वी आमच्या माथी मारून आज आमचा राजकीय बळी दिला जात आहे. हे अयोग्य आहे. हे पाप आहे! शिवडी विधानसभा मतदारसंघाला आम्ही आई-वडिलांप्रमाणे मानले. तिथल्या मतदारांना जपले. पण आज आमच्या नेत्यांनी जागावाटपात घेतलेला हा निर्णय केवळ आमचाच नाही, तर मनसेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक शिवडीकराचा विश्वासघात आहे.

फक्त मला एकट्यालाच उमेदवारी द्या असे माझे म्हणणे कधीच नव्हते. राग माझ्यावर असेल तर माझे दुसरे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक एकापेक्षा एक होते. त्यांनाही जनाधार आहे. मग त्यांच्यावर का अन्याय केलात ?

मी गेल्या अनेक दिवसांपासून शिवडी विधानसभा अध्यक्ष म्हणून वरिष्ठांकडे आपली बाजू मांडत होतो. आपला हक्क मिळावा म्हणून दिवसा-रात्री प्राणापणाने लढलो. पण माझे सर्व प्रयत्न विफल झाले. आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या, महाराष्ट्र सैनिकांच्या हक्काचा बळी दिला गेला आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक २०२, २०३, २०४ आणि २०६ या प्रभागांमधील महाराष्ट्र सैनिकांच्या पदरी केवळ उपेक्षाच आली आहे. त्यांचा ठरवून अवमान करण्यात आला आहे. आज त्यांच्यावर ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ असे हतबलपणे म्हणण्याची वेळ आणली गेली आहे. हे सारं आपण ज्यांना मान-सन्मान दिला त्या आपल्याच सन्माननिय नेत्यांनी केले आहे.

आमची काय अपेक्षा होती? आम्हाला पद, पैसा किंवा मोठा मान नको होता; फक्त राजसाहेबांनी पाठीवर हात ठेवून म्हणावे, “तू लढ, मी तुझ्या मागे आहे!” पण दुर्दैवाने, ज्या कार्यकर्त्यांनी २० वर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन लाठ्या-काठ्या खाल्ल्या, आज त्यांनाच दुसऱ्यांचे जोडे उचलण्यासाठी वाऱ्यावर सोडले गेले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

Ajit Pawar Baramati Plane Crash: भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील ‘दादा’ पर्वाचा बारामतीत करुण अंत; उद्या विद्या प्रतिष्ठानमध्ये दादांना अखेरचा निरोप, पीएम मोदी, अमित शाह उपस्थित राहणार

Ajit Pawar Baramati Plane Crash: भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील ‘दादा’ पर्वाचा बारामतीत करुण अंत; उद्या विद्या प्रतिष्ठानमध्ये दादांना अखेरचा निरोप, पीएम मोदी, अमित शाह उपस्थित राहणार