’50 खोके, एकदम ओके!’ ही घोषणा राज्याच्या राजकारणामध्ये मागील तीन ते चार वर्षांपासून जोरदार चर्चेत आहेत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड केल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत सहभागी झाले. यानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून ’50 खोके, एकदम ओके!’ अशी घोषणा देत या आमदारांना पैसे देण्यात आल्याचा आरोप केला. भाजपा आणि शिंदेंच्या आमदारांना डिवचण्यासाठी विरोधकांकडून अगदी विधानसभेपासून ते पत्रकार परिषदांमध्येही या वाक्याचा वापर अनेकदा करण्यात आला. मात्र सध्या सुरु असलेल्या महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडूनच 50 खोके एकदम ओकेची घोषणाबाजी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
कुठे घडला हा प्रकार?
मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार सायनमध्ये (शीव) घडला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिसताच भाजप कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या. शिवसेना शिंदे गटाकडूनही भाजपविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या सायन येथील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये प्रचारदरम्यान हा प्रकार घडला. या वॉर्डमध्ये भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना असा सामना रंगला आहे
कोणाविरुद्ध कोणाची लढाई? भाजपा शिवसेना एकमेकांविरुद्ध का लढत आहे?
या वॉर्डमध्ये भाजपकडून शिल्पा केळुसकर या उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडून 50 खोके एकदम ओके असा प्रचार करत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून पूजा रामदास कांबळे या उमेदवार आहेत. भाजपचे दत्ता केळुसकर यांना भाजपने एबी फॉर्म दिला होता, परंतु शिवसेना शिंदे गटाला हा प्रभाग सुटल्याने केळुसकर यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितला होता. परंतु त्यांनी अर्ज तसाच ठेवल्याने इथं महायुती अंतर्गत लढत होत आहे.
दत्ता केळुसकर यांनी खोचक शब्दांमध्ये साधला कांबळेंवर निशाणा
आम्ही काल चुकीची घोषणा दिली. आता आम्ही 11 खोके एकदम ओके अशी देतोय. झोपडपट्टीत राहणारा आपल्या प्रतिज्ञापत्रात पाच वर्षात 11 कोटींची मालमत्ता जाहीर करतो. यासाठी आम्ही ही घोषणा देतोय. मी नाही तर तो चोर आहे, असं दत्ता केळुसकर यांनी म्हटलं आहे. विधानसभेला भाजपला येथून 12 हजारांचे लीड असल्याने तो शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे गटात आला. मला भाजप पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. आमदार तमिळ सेल्वन यांचा मला पाठिंबा आहे. मला माहिती नाही काय तक्रार झालीय. पण माझी पत्नी इथं भाजपची उमेदवार आहे.









