काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या करण्यात आली आहे. हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी सायंकाळी झालेल्या हल्ल्याने अकोला जिल्हा हादरून गेलेला असतानाच आज पहाटे उपचारादरम्यान हिदायत पटेल यांनी अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या अटकेत असून हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कधी आणि कसा झाला हल्ला?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी हिदायत पटेल त्यांच्या मूळगावी मोहाळा येथील मरकझ मशिदीमधून बाहेर पडताच एका व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हिदायत पटेल हे मशिदीतून बाहेर येत असताना हल्लेखोराने त्यांच्या पोटात व मानेवर चाकूने वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ अकोट येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. आज पहाटे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
लोकसभा निवडणुकाही लढवल्या
हिदायत पटेल हे 73 वर्षांचे होते. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने 2014 आणि 2019 च्या अकोला लोकसभा निवडणुका लढवल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे अकोला जिल्ह्यासह संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. हिदायत पटेल यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे. या हल्ल्यामागील हेतू अजून स्पष्ट झालेला नाही.
मागील काही दिवसांमधील तिसरी हत्या
मागील काही दिवसांमध्ये अशाप्रकारे झालेली ही तिसरी राजकीय हत्या आहे. सोलापूरमध्ये मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची 2 जानेवारी 2026 रोजी राजकीय वादातून हत्या झाली. बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नात झालेल्या संघर्षातून बाळासाहेबांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हत्येमुळे सोलापूर शहरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल होऊन काही जणांना अटक झाली आहे.
खोपोलीत नगसेविकेच्या पतीची हत्या
रायगड जिल्ह्यातील खोपोलीत शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची डिसेंबर महिन्यात भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. निवडणुकीतील राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे, ज्यात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबीयांची भेट घेऊन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल असा शब्द कुटुंबियांना दिला.









