Search
Close this search box.

गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठी, 1 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याच्या मार्गावर आहे, गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याला स्टील सिटीचा दर्जाही प्राप्त करुन दिला जाणार आहे, विकासाच्या नावाने मोठे प्रकल्प गडचिरोलीत येत आहेत. मात्र, अद्यापही या गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वास्तव मन सुन्न करणारं आहे. येथे एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील आशा संतोष किरंगा या 9 महिन्यांच्या गरोदर मातेला (Health) प्रसूतीसाठी तब्बल सहा किलोमीटरची पायपीट करावी लागली. या शारीरिक त्रासामुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीत आधी पोटातील बाळ दगावले आणि काही वेळातच मातेनेही अखेरचा श्वास घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आल्यानंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता, याप्रकरणी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी येथील गावाला प्रत्यक्ष भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तेव्हा त्या मातेचा निष्काळजीपणा आणि पुजाऱ्याकडील चुकीच्या उपचारामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. आशा किरंगा या गरोदर महिलेची आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी केली जात होती. गावातील आशा स्वयंसेविका तिच्या संपर्कात होत्या. जानेवारी महिन्याच्या शेवटी तिच्या प्रसूतीची तारीख होती. मात्र, तिने नववर्षाच्या दिवशी पेटा येतील पुजाऱ्याकडे जाण्यासाठी सहा किलोमीटरची पायपीट केली. पुजाराकडे मुक्कामी राहून उपचार घेतला. मात्र, मध्यरात्री 1 वाजता अचानक प्रकृती बिघडल्याने गावातील आशा वर्करला माहिती देण्यात आली. तेथील आशाने त्या महिलेला ॲम्बुलन्सद्वारे हेडरी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

आलदंडी टोला गावात रस्ता नाही. त्यामुळे वेळेवर मदत मिळावी या आशेने आशा किरंगा नववर्षाच्या दिवशी पतीसोबत जंगलाच्या वाटेने 6 किलोमीटरची पायपीट करत पेठा येथील आपल्या बहिणीच्या घरी निघाल्या होत्या. मात्र पायापीटमुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना तीव्र प्रसववेदना सुरू झाल्या. तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना हेडरी येथील कालीअम्माल रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी सिझेरियनचा निर्णय घेतला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. पोटातच बाळाचा मृत्यू झाला होता आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे काही वेळातच आशा यांचीही प्राणज्योत मालवली. मृत्यूनंतरही या माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड थांबली नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत त्यांना पुन्हा 40 किलोमीटर लांब अहेरीला पाठवण्यात आले. जिवंतपणी नशिबी आलेली पायपीट मृत्यू पश्चातही उदासीन व्यवस्थेच्या फेऱ्यात अडकल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.  जिवंतपणी रस्त्याअभावी करावी लागलेली पायपीट मृत्यूनंतरही थांबली नाही, ही बाब अधिक वेदनादायक ठरली.

admin
Author: admin

और पढ़ें