ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांच्या आई संथकुमारी यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. कोचीतील एलमक्कारा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या काही काळापासून पॅरालिसिस या आजाराने त्रस्त होत्या आणि प्रकृतीही ठीक नव्हती.
संथकुमारी या दिवंगत विश्वनाथन नायर यांच्या पत्नी होत्या. विश्वनाथन नायर हे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी होते. त्यांच्या कुटुंबात मोठा मुलगा प्यारेलाल यांचे 2000 साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तर धाकटा मुलगा म्हणजेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल. संथकुमारी यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मोहनलालसाठी प्रेरणास्थान
संथकुमारी या मोहनलाल यांच्या आयुष्यात कायम प्रेरणा आणि आशीर्वाद देणाऱ्या व्यक्ती होत्या. आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय मोहनलाल अनेकदा आईलाच देत असत. ‘माझ्या यशाचा कणा म्हणजे माझी आई’ असं ते अभिमानाने सांगायचे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर आईचा आशीर्वाद महत्त्वाचा असल्याचं त्यांनी वेळोवेळी नमूद केलं आहे.
झगमगाटापासून दूर, सिंपल आयुष्य
मोहनलाल सुपरस्टार असतानाही संथकुमारी यांनी नेहमीच खाजगी आणि सिंपल आयुष्य जगणं पसंत केलं. त्या कधीही प्रसिद्धीझोतात राहिल्या नाहीत. मात्र, मोहनलाल आणि त्यांच्या आईमधील घट्ट नातं चाहत्यांना नेहमीच भावायचं. दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्याआधी मोहनलाल यांनी आईकडून घेतलेले आशीर्वाद हे क्षण चाहत्यांच्या मनात आजही कोरलेले आहेत.
संथकुमारी या पारंपरिक, प्रेमळ आणि संस्कारशील आईचं जिवंत उदाहरण होत्या. मोहनलाल यांच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या मातृभूमिकांशी त्यांची प्रतिमा जणू जुळून जात होती. त्यामुळे त्या अनेक चाहत्यांसाठी मातृप्रेमाचं प्रतीक बनल्या होत्या.
‘विश्वशांती फाउंडेशन’ला आई-वडिलांचं नाव
मोहनलाल यांच्या ‘विश्वशांती फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेला त्यांच्या आई-वडिलांच्या नावावरूनच नाव देण्यात आलं आहे. हेच त्यांच्या आई-वडिलांप्रती असलेल्या आदराचं आणि प्रेमाचं मोठं प्रतीक मानलं जातं.
संथकुमारी यांच्या निधनामुळे मोहनलाल कुटुंबावर आणि त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली असून, चित्रपटसृष्टीतून अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.









