गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत फारसे असित्व नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची कमान एकहाती सांभाळणाऱ्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या तिकीटवाटपाच्या बोलणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवार गटाच्या मुंबई जिल्हा अध्यक्ष राखी जाधव या भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election 2026) शरद पवार गटाने ठाकरे बंधूंशी युती केली आहे. मात्र, त्यांच्या वाट्याला फक्त 5 ते 10 जागा आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत शरद पवार गटाचे नेतृत्त्व करणाऱ्या राखी जाधव (Rakhi Jadhav) यांना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. इतक्या कमी जागा मिळाल्यामुळे राखी जाधव या प्रचंड नाराज झाल्या होत्या. याच नाराजीतून राखी जाधव यांनी भाजपची वाट धरल्याचे बोलले जात आहे. राखी जाधव या सोमवारीच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करतील. त्यांना घाटकोपर येथील त्यांच्या वॉर्डमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, राखी जाधव यांच्या जाण्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
राखी जाधव या गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा किल्ला एकहाती लढवत होत्या. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद फारशी नाही. त्यामुळे मुंबईत शक्य त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी करणे, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना पक्षासोबत ठेवण्यात राखी जाधव या महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. मात्र, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शरद पवार गटाच्या वाट्याला फक्त 5 ते 10 जागा आल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, याविषयी विचारले असता वरिष्ठांनी त्यांना इच्छूक उमेदवारांना अजित पवार गटात पाठवण्याची सूचना केली होती. पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांची ताटातूट होऊ नये म्हणून थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करा आणि निवडणूक लढा, असे सांगण्यात आले. याबाबत पक्ष कार्यालयातूनच उमेदवाराना फोन गेल्यामुळे अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, हिंदी भाषिक सेलचे प्रमुख मनीष दुबे, गुजराती विभाग मुंबई अध्यक्ष यामिनीबेन पंचाल, जितेंद्र आव्हाड यांचा निष्ठावान कार्यकर्ता नितीन देशमुख, सरचिटणीस अशोक पांचाल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आजदेखील शरद पवार गटातील अनेक इच्छूक उमेदवार अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करतील. या सगळ्यामुळे राखी जाधव या प्रचंड नाराज झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
Rakhi Jadhav Mumbai: राखी जाधव यांच्या नाराजीची प्रमुख कारणे
1. पक्षाला ५२ उमेदवारांची निवडणुकीसाठी यादी दिली. काँग्रेस किंवा ठाकरे बंधू यांच्याकडून किमान ३० जागा मिळणे अपेक्षित होते तसे वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होणे अपेक्षित होते, मात्र ते झालं नाही.
2. ज्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले त्यांना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढा, असे पक्षाकडून सांगण्यात आले
3. ज्यांच्या विरोधात संघर्ष केला त्यांच्यासोबत काम कसं करणार ही समस्या निर्माण झाली
4. अनेक वर्षांच्या राखी जाधव- नवाब मलिक संघर्षात पुन्हा नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली काम कसं करणार, हा प्रश्न निर्माण झाला
5. ठाकरे बंधूंनी राखी जाधव यांची जागा सोडली. मात्र, त्यांच्यासोबत प्रामाणिक राहिलेल्या माजी नगरसेवक मनीषा रहाटे, धनंजय पिसाळ यांची जागा सोडायला नकार दिला









