भारत आणि श्रीलंका महिला संघात चौथी टी 20 मॅच तिरुअनंतपुरम येथे पार पडली. भारतानं या सामन्यात 30 धावांनी विजय मिळवला. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या दोघींच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं 221 धावा केल्या होत्या. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा टी 20 महिला क्रिकेटमध्ये 150 पेक्षा अधिक धावांची सलामीची भागीदारी करणारी पहिली जोडी ठरली आहे. श्रीलंकेनं चांगली सुरुवात केल्यानंतर त्यांना 20 ओव्हरमध्ये 191 धावा करता आल्या. भारतानं मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 221 धावा केल्या होत्या. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या दोघांनी 162 धावांची सलामीची भागीदारी केली. स्मृती मानधना हिनं 48 बॉलमध्ये 80 धाव केल्या. शफाली वर्मानं 79 धावांची खेळी केली. रिचा घोष हिनं 16 बॉलमध्ये 40 धावा केल्या. वनडे वर्ल्ड कपनंतरचं स्मृती मानधनाचं हे पहिलं अर्धशतक ठरलं.
चांगल्या सुरुवातीनंतर श्रीलंकेचा पराभव
222 धावांचं आव्हान घेऊन फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेनं चांगली सुरुवात केली होती. पॉवरप्ले संपेपर्यंत चमारी अट्टापट्टू आणि हसीनी परेरा यांनी 59 धावांची सलामीची भागीदारी केली होती. श्रीलंकेनं 1 बाद 116 धावा केल्या होत्या. त्यानंतर चमारी अटापट्टू 52 धावा करुन बाद झाली.
कर्णधार बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या इतर फलंदाजांचा टिकाव लागला नाही. शेवटच्या 7 ओव्हरमध्ये श्रीलंकेला विजयासाठी 106 धावा हव्या होत्या. श्रीलंका शेवटच्या 7 ओव्हरमध्ये 76 धावा करु शकली. श्रीलंकेला 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. श्रीलंकेसाठी आशादायक बाब म्हणजेच आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 191 धावा ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताकडून अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा यांनी दोन दोन विकेट घेतल्या. श्री चरणी केवळ एक विकेट घेऊ शकली.
भारतानं हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वात पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत पहिल्या चार सामन्यात विजय मिळवला आहे. वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्याच मालिकेत भारतीय महिला संघानं दमदार कामगिरी केली आहे. आता भारत आणि श्रीलंका यांच्यात अजून एक सामना होणार आहे. त्या सामन्यात श्रीलंका विजयाचं खातं उघडणार का ते पाहावं लागेल.









