Search
Close this search box.

महाराष्ट्रातील ‘या’ 2 स्थानकांवर दुप्पट ट्रेन! पुण्यासाठी तब्बल 3 पर्यायी स्टेशन्स; असा आहे मास्टर प्लॅन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महराष्ट्रातील औद्योगिक केंद्र असलेल्या मुंबई आणि पुण्यामध्ये पुढील पाच वर्षांमध्ये रेल्वे सेवा कात टाकणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील माहिती दिली असून देशातील काही मोजक्या शहरांमधील रेल्वे स्थानकं अपग्रेड केली जाणार असून यात मुंबई, पुण्याचा समावेश आहे.

कोणत्या शहरांचा समावेश?

दिवसोंदिवस वाढती प्रवासी संख्या, तसेच शहरांची होणारी वाढ लक्षात घेत केंद्र सरकारने रेल्वे स्थानकांसंदर्भात विशेष नियोजन करण्याच्या विचारात आहे. 2030 पर्यंत देशातील मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, पटणा, मथुरा, आग्रा, लुधियाना यांसह 48 प्रमुख शहरांमध्ये नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याची क्षमता दुप्पट करणे आवश्यक असल्याचे रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले.

पुण्याच्या आजूबाजूला तीन मोठी स्थानकं

रेल्वे प्रवासाबाबतच्या पायाभूत सुविधा वाढविणे, टर्मिनल्सची क्षमता वाढवताना त्याच्या नजीक असलेल्या अन्य रेल्वे स्टेशनचाही विकास करण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील तसेच प्रवाशांच्या वाढत्या संख्येलाही सामावून घेणे शक्य होईल. पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म व स्टॅबलिंग लाइन्स वाढविण्यासह हडपसर, खडकी आणि आळंदी या रेल्वेस्टेशनमध्येही अधिक पायाभूत सुविधा उभारण्याचा विचार सुरू असल्याचे या मंत्रालयाने म्हटले आहे.

‘उपनगरीय’ सेवेलाही फायदा

48 शहरांसाठीच्या या योजनेत उपनगरीय तसेच बिगर उपनगरीय रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या निर्णयाचा मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेलाही फायदा होणार आहे. ही योजना लवकरच नियोजन संचालनालयाकडे सादर केली जाईल. या योजनेत नियोजित, प्रस्तावित किंवा आधीच मंजूर कामांचा समावेश असेल असंही सांगण्यात आलं आहे. वेळापत्रकानुसार ट्रेन हँडलिंगची क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साधण्याचा हेतू या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला येईल.

पुण्यातील रोजची प्रवासी संख्या किती?

पुणे रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. या रेल्वे स्थानकावरुन दररोज सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांबरोबरच इतर राज्यात जाणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे केवळ पुणे-मुंबई मार्गावर रोज हजारो नोकरदार आणि विद्यार्थी प्रवास करतात. लोकल, एक्स्प्रेस आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या माध्यमातून इथून प्रवासी वाहतूक होते. शहराचा पसारा आणि लोकसंख्या वाढत असल्याने येथील वर्दळ वाढत असून सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळेच पुणे स्थानकाला पर्यायी स्थानकं निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असून या योजनेच्या माध्यमातून तीन असे पर्याय तयार होणार असल्याचं दिसत आहे.

या योजनेअंतर्गत काय काय करणार?

> विद्यमान टर्मिनलमध्ये अतिरिक्त प्लॅटफॉर्मची निर्मिती

> आवश्यकता असल्यास नवीन टर्मिनलची उभारणी

> मेगा कोचिंग कॉम्प्लेक्ससह देखभाल सुविधा निर्माण करणे

> नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याची क्षमता दुप्पट करणे

admin
Author: admin

और पढ़ें