भाईंदरमधील तलाव रोड परिसरात आज अचानक बिबट्या दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मानवी वस्तीत आलेल्या या बिबट्याने एका कुटुंबावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये बिबट्या निर्धास्तपणे फिरतानाचे फोटो, व्हिडीओ काढले आहेत. बिबट्या एका इमारतीमध्ये शिरल्याचेही या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि वनविभागाला तातडीने कळवण्यात आले असून प्रशासन सतर्क झालं आहे.
परिसरात बिबट्या असल्याने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू असून, बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी वनविभागाचे पथक कार्यरत आहे. मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी झाले असून, एक जण गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी नेण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, बिबट्या एका घरात असून अग्निशमन दलाचे पथक त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.
आंबेगाव तालुक्यात बिबट्याला पकडण्यात यश
आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर येथे दहशत माजविलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. जेरबंद केलेल्या बिबट्याला माणिकडोह निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे. गेले काही दिवस या भागात बिबट्याचे नित्यदर्शन होत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणात निर्माण झाले होते. मात्र आता हा बिबट्या पकडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
शिरूर तालुक्यातील बिबट्याने केला कुत्र्याची शिकार
दुसरीकडे शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा येथे बिबट्याने घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करत कुत्र्याची शिकार केली. महत्वाच म्हणजे 12.5 HP च्या बंद विद्युत पंपासकट बिबट्याने या श्वानाला काही फुट ओढत नेलं. त्यामुळे बिबट्या च्या शरिरात किती ताकद असते याचा अंदाज येत आहे, कुत्र्याला ठार केल्यानंतर बिबट्याने त्याला उचलून नेण्याचा खुप प्रयत्न केला. मात्र कुत्रा साखळीने बांधलेला असल्यामुळे त्याला शिकार ठार केल्या नंतर घेऊन जाता आली नाही. मात्र बिबट्याची दहशत पसरली आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्याच मोठ आव्हान आता वनविभागा पुढे असणार आहे.









