बदलापूरमधील एका राजकीय व्यक्तीच्या मृत्यूसंदर्भात खळबळजनक खुलासा समोर आला आहे. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू नैसर्गिक असल्याचं मानलं जात होतं. मात्र आता तीन वर्षानंतर हा सुनियोजित हत्येचा कट असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे एका वेगळ्याच प्रकरणाच्या चौकशीदरम्यान आरोपींनी या तीन वर्षांपूर्वीची हत्येचीही कबुली दिली आहे.
वेगळ्याच प्रकरणाच्या चौकशीत खुलासा
बदलापूरमध्ये निवडणूक काळात एका वेगळ्या प्रकरणामध्ये हत्येचा प्रयत्नाच्या गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारची पोलिसांकडून चौकशी सुरु होती. ऋषिकेश चाळके असं या आरोपीचं नाव असून त्याच्या चौकशीदरम्यान एक धक्कादायक खुलासा समोर आला. पोलिसांनी चाळकेच्या मागील गुन्हेगारी कृत्यांबद्दल चौकशी केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान चाळकेने कथितरित्या एक कबुलीजबाब नोंदवला. त्याने केलेला खुलासा ऐकून तपास अधिकारीही थक्क झाले. चाळकेने नीरजा आंबेकर यांच्या 2022 मधील मृत्यूमागील सत्यच पोलिसांना सांगितलं.
कोणी केली ही हत्या?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळकेने सांगितले की, नीरजा यांची हत्या त्यांचा पती रुपेश आंबेकरने चेतन दुधाणे, कुणाल चौधरी आणि स्वतः ऋषिकेश चाळके या तीन साथीदारांच्या मदतीने केली होती. हा गुन्हा सापाच्या दंशामुळे मृत्यू झाल्यासारखा वाटावा यासाठी चतुराईने रचण्यात आला होता. हा सारा कट कसा शिजला हे चाळकेने पोलिसांना सांगितलं.
कशी करण्यात आली हत्या?
तपास अधिकाऱ्यांनी चाळकेने केलेल्या खुलाशानंतर माहिती देताना सांगितले की, आरोपींनी एका पोत्यात विषारी साप आणून तो नीरजा आंबेकर यांच्या घरातील स्वयंपाकघरात लपवून ठेवला होता. नीरजा यांच्या पायांना मालिश करण्याच्या बहाण्याने त्यांना हॉलमध्ये झोपवण्यात आले. त्यावेळी, कथितरित्या सर्पमित्र असलेल्या चेतन दुधाणेने साप बाहेर काढून चाळकेच्या हातात दिला. त्या सापाकडून नीरजा यांच्या डाव्या घोट्याजवळ तीन वेळा दंश करवण्यात आला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
तीन वर्ष काहीच घडलं नाही
या घटनेनंतर, मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्यात आले आणि त्यावेळी केवळ अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली होती. त्यावेळी कोणताही घातपाताचा संशय आला नाही, ज्यामुळे आरोपी जवळपास तीन वर्षे कायद्याच्या कचाट्यातून वाचले.
डॉक्टरांची चौकशी होणार
चाळकेच्या कबुलीजबाबाच्या आधारे, पोलिसांनी आता रुपेश आंबेकर, चेतन दुधाणे, कुणाल चौधरी अशा एकूण चार आरोपींना अटक केली आहे. हा खटला खुनाचा गुन्हा म्हणून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, हत्येमागील हेतू निश्चित करण्यासाठी आणि केलेल्या दाव्यांना पाठबळ देणारे पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.
आणखी एका महत्त्वाच्या घडामोडीत, पोलिसांनी मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे घोषित करणारे मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची भूमिका तपासण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी संकेत दिले की, संभाव्य निष्काळजीपणा किंवा प्रक्रियेतील त्रुटींसाठी कुळगाव-बदलापूर येथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.









