कांदिवली पूर्वमध्ये साईबाबांच्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमात दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली. कांदिवली पूर्व भागातील रामगढ परिसरामध्ये हा राडा झाला. यामध्ये लाठीने एकमेकांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं असून दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आली आहे.
मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील रामगढ परिसरामध्ये साईबाबांच्या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी या ठिकाणच्या पाण्याच्या पाईपवरुन वाद सुरू झाला. त्यानंतर हा वाद वाढला आणि ठाकरे गटाचा कार्यकर्ता आणि काही स्थानिक तरुणांमध्ये हाणामारीची घटना घडली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
Kandivali Sai Baba Bhandara : दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात तक्रार
रामगढ परिसरातील काही तरुण यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हाणामारी करणारा ठाकरे गटाचा कार्यकर्ता आणि स्थानिकांना ताब्यात घेतलं आहे. या हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांमध्ये एकमेकांच्या विरोधात क्रॉस कम्प्लेंट दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.








