पुणे कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार उघड केल्यानंतर त्याचा मोठा इम्पॅक्ट झाला आहे. पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला अटक केली आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातल्या 40 एकर जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणात शीतल तेजवानी हिनं मोठी भूमिका बजावली होती. शीतल तेजवानीनं जमीन ताब्यात घेण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नीचं हत्यार वापरलं होतं. तिनं जमीन थेट नावावर करण्यासाठी वेगवेगळे फंडेही वापरले होते. पुणे पोलिसांनी तिची याप्रकरणी चौकशीही केली होती. अखेर आता तिला अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील मोक्याची 40 एकर जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांनी संगनमत करून बळकावल्याचे कागदोपत्री सिद्ध करून हा घोटाळा समोर आणला होता. या प्रकरणाचा गंधही नसल्याचे दाखवणाऱ्या सरकारी यंत्रणांना कामाला लावले आणि या व्यवहारातील मास्टरमाइंड शीतल तेजवानी अखेर पोलिसांनी अटक केली.
शीतल तेजवानीच्या अटकेमुळे या गैरव्यवहारातील बरेच काळेबरे बाहेर येतील. या प्रकरणात तेजवानी आणि अमेडिया कंपनीच्या संचालकांनी नेमकी काय आणि कशी बनवाबनवी केली आहे, यानुषंगाने पोलीस तपास करीत होते. त्यात, विकास खारगे समिती आणि राजेंद्र मुठे समितीही पोलिसांना माहिती देत होती. शिवाय, पुणे शहर तहसिल कार्यालयापासून अगदी जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षकांच्या अहवालांचा आधार घेऊन पुणे पोलिसांनी तपास केला. याबाबत शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांनी पोलिसांना फारसे सहकार्य केले नव्हते, असे सांगितले जात आहे. या प्रकरणात दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
पुणे पोलिसांनी नोंदवला होता जबाब
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शीतल तेजवानीचा जबाब नोंदवला होता. 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 नंतर शीतल तेजवानी पोलीस आयुक्तालयात आली होती. त्यानंतर 20 नोव्हेंबरला पुणे पोलीस आयुक्तालयात हजर झाली. तिथे तेजवानीचा प्राथमिक जबाब नोंदवण्यात आला. तिला संबंधित कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. शीतल तेजवानीला अटक का केली नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारला होता.
अशी आहे टाइमलाइन?
शीतल तेजवानीवर 6 नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर 9 दिवस पोलीस शांत राहिले. तब्बल 9 दिवसानंतर पोलिसांनी 14 नोव्हेंबरला नोटीस बजावली. 14 नोव्हेंबरला चौकशीसाठी नोटीस बजावली. नोटीस बजावल्यानंतर 5 दिवसांनी शीतल चौकशीसाठी हजर झाली. शीतलनं तोपर्यंत हायकोर्टात गुन्हा रद्द करण्याची याचिका केली. कोर्टातून शीतलला दिलासा मिळाला नाही. 3 डिसेंबरला तिला अटक करण्यात आली.
कोण आहे शीतल तेजवानी?
पार्थ अजित पवार यांच्या अमेडिया कंपनीनं जमीन खरेदी करताना अनेक नियमितता केल्याचं समोर आलं होतं. महार वतनाची जमीन म्हणजेच इन्फिरिअर वतन लँडची खरेदी विक्री करता येत नाही, तरीही नियम डावलून या जमिनीची विक्री 300 कोटींना करण्यात आली होती. यावर कळस म्हणजे जमिनीची विक्री करताना सातबारावर सरकारचं नाव असताना उपनिबंधकांनी त्यावर आक्षेप घेतला नव्हता. पार्थ अजित पवारांच्या अमेडिया कंपनीनं नियम धाब्यावर बसवून जमीन सरकारच्या नावावरची जमीन खरेदीचा घाट घातला होता. हे सगळं झी २४ तासनं उघडकीस आणलं होतं.
शीतल तेजवानीचा नेमका काय संबंध?
शीतल तेजवानी हिनं कोरेगाव पार्क जमीन व्यवहारात अतिशय महत्वाची भूमिका बजावली. याच शीतल तेजवानी हिनं कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या जमिनीच्या मालकांशी संपर्क साधला होता.
सर्व्हे क्र. 88 हिस्सा नंबर 1 ते 26 – ही जमीन बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती. ती जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवणं आणि त्याच्या विक्रीसाठी कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी करवून घेतली. शीतलनं जवळपास दोन ते तीन वर्ष परिसरातल्या 272 जणांचा शोध घेऊन त्या जमिनीच्या पॉवर ऑफ अटर्नी करवून घेतल्या. या पॉवर ऑफ अटर्नीच्या मोबदल्यात कुणाला 2 हजार कुणाला 5 हजार तर कुणाला 25 हजार देऊन त्यांना वाटेस लावलं.
शीतल तेजवानीनं जमीन हडपण्याचं काम एकदम थंड डोक्यानं सुरु ठेवलं होतं. अजगर जसा आपल्या भक्षाला गिळतो आणि शांत बसतो तशी शीतल तेजवानी जमीन हडपून शांत बसली होती. ती एका संधीची वाट पाहत होती. 2025मध्ये शीतलनं अमेडिया कंपनीच्या रुपानं पार्थ अजित पवार हा ग्राहक शोधला होता. कागदपत्रांवर विश्वास ठेवला तर 300 कोटी रुपये शीतलनं घेतल्याचं दिसतंय. प्रत्यक्षात ही रक्कम कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे.








