एकीकडे मुंबईत 11 लाख दुबार मतदार वाढल्याचा आरोप केला जात असताना दुसरीकडे बोगस मतदारांची यादी चव्हाट्यावर आणली जात आहे. चेंबूर येथील पुरुष शासकीय भिक्षुक गृहातील 100 हून अधिक भिक्षुकांची मतदार यादीत मतदार म्हणून नोंदणी करण्यात आल्याचा प्रकार मनसेने उघडकीस आणला. तसेच या भिक्षुक गृहात सध्या राहत नसलेल्यांचीही नावे मतदार यादीत नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे मनसेने या भिक्षुक गृहावर धडक मोहीम राबवत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 152 मध्ये बेगर्स होम म्हणजे शासकीय भिक्षुक केंद्र आहे. सिग्नलवर जे भिकारी असतात, किंवा नशा करणाऱ्या लोकांना या केंद्रात आणलं जातं. अशा लोकांचीही नावे या मतदारयादीत आहेत. या यादीमध्ये अशा अनेकांची नावे आहेत जी सध्या त्या ठिकाणी राहत नाहीत.
MNS On Bogus Voter List : मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा
याबद्दल बोलताना मनसेचे चेंबुर विभागाध्यक्ष माऊली थोरवे म्हणाले की, “या सुधारकेंद्रात ज्या भिक्षुकांची नावे नोंदवण्यात आली आहेत त्यांची यादी आमच्याकडे आहेत. यामध्ये 100 हून अधिक मतदार आहेत. या मतदारयादीमध्ये ज्यांनी नावे आहेत त्यापैकी अनेकजण आता केंद्रात राहत नाहीत. मग अशांची नावे का कमी करण्यात आली नाहीत? याबाबतीत अधिकाऱ्यांकडे काहीही उत्तर नाही. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी आणि या याद्या तपासाव्यात. अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करू.”
Mumbai Bogus Voters List : मुंबईत 11 लाख दुबार मतदार
मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेने तशी कबुली दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली. निवडणूक आयोगाने थेट दुबार नावाबाबत, मुंबई महापालिकेकडे बोट दाखवत हात वर केले. दरम्यान, शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेकडूनही बोगस मतदार यादीचा आरोप करण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी याद्यांत फक्त पत्ते असून, नावे मात्र गायब आहेत. दुबार नावे दाखवण्यासाठी वापरलेल्या चिन्हाऐवजी दुसऱ्या चिन्हाचा वापर केल्यानेही गोंधळ आहे. हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी 27 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. मात्र, दोनच दिवसांत या यादीवर तक्रारींचा पाऊस पडलाय.
महापालिका मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन महापालिका स्तरावर करण्यात आल्याचे आधीच राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुबार मतदार वगळण्याचे आणि मतदार याद्यांतील घोळ दूर करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.








