डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात पती अनंत गर्जेला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. अनंत गर्जे हे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए आहेत. वरळी पोलिसांनी रात्री एक वाजता ही कारवाई केली आहे.
वरळी पोलिसांनी रात्री एक वाजता अनंत गर्जेला अटक केली आहे. पत्नी गौरी गर्जेचा शारीरिक, मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अनंत गर्जेवर गुन्हा दाखल आहे. अनंत गर्जेसह नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जेवर वरळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गौरीच्या माहेरच्या लोकांनी अनंत गर्जेवर गंभीर आरोप केले होते. तसेच प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
गौरी गर्जे आत्महत्येपूर्वी अनंतच्या आधीच्या पत्नीचे गर्भवती असल्याची कागदपत्रे मिळाल्याने ती अस्वस्थ होती. ती कागदपत्रे तिने आम्हाला पाठवली होती, असा जबाब गौरीच्या वडिलांनी नोंदवला होता. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अनंत गर्जे यांच्यासह वरळी पोलीस ठाण्यात तिघांवर बीएनएस कलम १०८,८५, ३५२,३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, गौरी गर्जे आणि अनंत गर्जे यांचा नऊ महिन्यांपूर्वीच थाटात विवाह पार पडला होता. शनिवारी राहत्या घरात गौरीने गळफास लावून आत्महत्या केली. पतीच्या अनैतिक संबंधातून सुरू असलेल्या वादातून तिचा बळी गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. मूळची बीडची रहिवासी असलेली गौरी हिचे वडील अशोक पालवे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ते वैद्यकीय योग शिक्षक आहेत तर आई परिचारिका म्हणून कार्यरत आहे. बीडीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये डेन्टल असिस्टंट म्हणून गौरी नोकरी करत होती. त्यानंतर सायन हॉस्पिटल येथे डेन्टल सर्जन म्हणून नोकरी केली.
कुटुंबीयाचे आरोप
अनंतने किरकोळ कारणातून वाद सुरू केले. तिने हे सांगताच कुटुंबियांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पतीच्या अनैतिक संबंधामुळे ती तणावात होती. यावर्षी ७ फेब्रुवारी रोजी गौरीचा अनंत गर्जे यांच्यासोबत थाटात विवाह सोहळा पार पडला. पंकजा मुंडे यांनीही लग्नात हजेरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या. लग्नानंतर दोघे मुंबईत नोकरीस असल्याने ते वरळीत राहण्यास आले. लग्नाच्या काही दिवसांत त्यांच्यात खटके उडू लागले होते.








