मुंबईत काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं बघायला मिळालं आहे. भाजप नेते अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर आज मोठा गोंधळ उडाला. गेल्या काही दिवसांपासून अमित साटम आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यात राजकीय युद्ध रंगलेलं बघायला मिळत आहेत. अस्लम शेख यांनी धमकी दिल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता. त्यानंतर अमित साटम यांनी आज अस्लम शेख यांच्यावर अतिशय टोकदार शब्दांनी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेनंतर मुंबईतील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
काँग्रेसचे कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने अमित साटम यांच्या अंधेरी पश्चिम येथील कार्यालयावर मोर्चा घेऊन गेली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी इथे आधीपासूनच बॅरिकेटिंग लावून ठेवले होते. पण तरीही काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनासाठी आल्यानंतर भाजपचे कार्यकर्तेदेखील समोर आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही धुमश्चक्री होताना दिसली.
दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले तेव्हा पोलिसांनी परिस्थिती सांभाळली. पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली. यानंतर परिस्थिती निवाळली. दरम्यान, भाजपचे कार्यकर्ते यावेळी आक्रमक झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नंतर जोरदार घोषणाबाजी केली. हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत अमित साटम यांच्या कार्यालयाच्या दिशेला गेली. या भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसवर सडकून टीका देखील केली. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होण्यामागचं अमित साटम यांचं काय वक्तव्य होतं ते आपण जाणून घेऊयात.
अमित साटम काय म्हणाले होते?
“अस्लम शेख यांना सांगू इच्छितो, आपल्या सारख्या पाकिस्तानच्या औलादींना आम्ही अजिबाद भीक घालत नाहीत. तुम्ही मालाडमध्ये ज्याप्रकारे मालवणी पॅर्टन चालवेला आहे तो उखाडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. येणाऱ्या काळात तुमच्यासारखी हिरवी पिलावळं या मुंबईत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. त्यामुळे अशाप्रकारचे आरोप आणि वल्गना कदापी करु नये. कायद्याच्याआधीन राहून तुमच्यावर कारवाई होईल”, असं अमित साटम म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.








