मुंबई मान्सूननंतरच्या देखभालीसाठी आज, गुरुवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार आहेत. जागतिक विमान वाहतूक मानकांचे पालन, सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी या बंदचे नियोजन करण्यात आले आहे. विमानचालकांना सूचना आगाऊ जारी करण्यात आली होती. विमानसेवा आणि इतर भागधारकांना त्यानुसार विमान वेळापत्रक व मनुष्यबळ नियोजन समायोजित करता येईल. या सूचनांमुळे कोणत्याही विमानसेवेवर परिणाम होणार नाही आणि प्रवाशांची गैरसोय होणार नाही. देखरेखीमध्ये तपशीलवार तपासणी, पृष्ठभागाची प्रकाशयोजना, खुणा आणि ड्रेनेज दुरुस्ती व धावपट्टीवरील सिस्टमचे तांत्रिक मूल्यांकन यांचा समावेश असेल. मान्सूननंतरची ही देखरेख विमानतळाच्या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमाचा अविभाज्य भाग आहे.









