मुंबईत सीएनजीचा तुटवडा असल्याने पेट्रोल पंपांवर वाहनांची रांग लागली आहे. वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रविवारी दुपारपासून मुंबईला होणारा सीएनजी वायूचा पुरवठा ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे झाला असून, रिक्षा, टॅक्सी आणि कॅबची वाहतूक ठप्प झाली आहे. रविवारी दुपारपासून पेट्रोल पंपांवर सीएनजी गॅस (CNG Gas) पोहोचलेला नाही. त्यामुळे मुंबई, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरातील बहुतांश पेट्रोल पंपांवरील सीएनजी संपला आहे. दरम्यान सीएनजी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी मंगळवारपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याने सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या अनेकांना फटका बसला आहे. रिक्षा, टॅक्सी उपलब्ध नसल्याने अनेकांची धावाधाव झाली. सीएनजीअभावी सकाळपासून रस्त्यांवर रिक्षा आणि टॅक्सींची संख्या कमी आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे.
कधीपर्यंत सुरळीत होणार सीएनजी पुरवठा
गेल कंपनीची सीएनजी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. उद्या सकाळपर्यंत पाईपलाइन दुरुस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीएनजी पुरवठा पूर्ववत होण्यास उद्याचा दिवस उजाडणार असल्याची माहिती आहे.
वडाळा सिटी टर्मिनल येथे गेल कंपनीकडून महानगर सीएनजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मध्ये काल दुपारी बिघाड झाला आहे. 24 तास उलटले तरी पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम अजूनही सुरू आहे. आणखी काही तास या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी लागणार असल्याची माहिती आहे.
महानगर गॅसकडून महापे सिटी टर्मिनल आणि इतर ठिकाणाहून काही सीएनजी पंपांवर सीएनजी पुरवठा करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आलं आहे.
पीएनजी घरगुती वापराच्या गॅसला कुठलाही व्यत्यय येणार नाही. शिवाय काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सुद्धा सूचना महानगर गॅस लिमिटेड करून करण्यात आले आहेत. बहुतांश सीएनजी पंप हे अजूनही बंदच आहेत. काही सीएनजी पंप वडाळा सिटी टर्मिनल सोडून इतर सिटी टर्मिनल कडून पुरवठा केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई — या तिन्ही शहरांमध्ये सीएनजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. कारण आरसीएफ कंपाऊंडमधल्या मुख्य सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये मोठा बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. या बिघाडामुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला जाणारा गॅस पुरवठा अचानक कमी झाला आणि त्याचे थेट पडसाद संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात उमटलेत. महानगर गॅस लिमिटेडने मात्र घरगुती ग्राहकांना प्राधान्याने पीएनजीचा पुरवठा सुरळीत ठेवला जाईल, अशी खात्री दिली आहे. पण सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खाजगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसताना दिसत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील जवळपास 133 सीएनजी पंपांवर याचा परिणाम झाला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी, तसेच बेस्टच्या काही बसेस सीएनजीवर चालतात.








