भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना हा कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला गेला. यात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी साऊथ आफ्रिकेने टीम इंडियावर 30 धावांनी विजय मिळवला. ज्यामुळे साऊथ आफ्रिकेने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) याच्या मानेला दुखापत झाल्याने तो पहिल्या डावात रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर पडला होता. त्याला कोलकाताच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती सुद्धा समोर आली. त्यानंतर आता गिलला रविवारी संध्याकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. मात्र यावेळचा गिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामुळे चाहत्यांना त्याच्या तब्येतीची चिंता वाटतेय.
हॉस्पिटलमध्ये केलं होतं दाखल :
कर्णधार शुभमन गिल याला रविवारी सकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मान दुखीमुळे तो त्रस्त होता. मात्र काहीवेळापूर्वी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच गिल हॉस्पिटलमध्ये असताना बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली हे सुद्धा त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. कर्णधार शुभमन गिलला डिस्चार्ज मिळाला असला तरी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना गिलच्या हातावर सलाईनच्या सुईमुळे लावण्यात आलेलं बँडेड होतं, तसेच त्याच्या मानेला पट्टा लावलेला होता. कोलकाता येथील कोलकाताच्या वुडलंड्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यावर त्याला हॉटेलवर नेण्यात आलं जिथे टीम इंडियाच्या खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. डिस्चार्ज देताना गिलची अशी अवस्था पाहून चाहत्यांना त्याच्या तब्येतीची चिंता वाटू लागली आहे. तसेच मानेच्या दुखापतीमुळे कर्णधार शुभमन गिलने पहिला सामना गमावला. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २२ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात तो खेळेल कि नाही याबाबत अजूनही शंका आहे.
शुभमन गिलला अशी झाली दुखापत?
वॉशिंग्टन सुंदरच्या रूपात टीम इंडियाची दुसरी विकेट पडल्यावर स्कोअर 75 धावांवर 2 विकेट असा होता. यावेळी कर्णधार शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. त्याने ३ बॉलचा सामना केला यात तो 4 धावा करू शकला. मात्र त्यानंतर तो रिटायर हर्ट होऊन बाहेर पडला. सायमन हार्मरविरुद्ध दोन चेंडूंचा बचाव केल्यानंतर, शुभमनने तिसऱ्या बॉलवर एक चौकार मारला, परंतु त्यानंतर त्याच्या मानेला दुखापत झाली. तेव्हा वेदनेने त्रस्त होऊन, शुभमन गिलने खेळ थांबवून मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या सामन्यातूनच गिल बाहेर पडला.








