शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 13 वा स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने राज्यभरातील शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते छत्रपती शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करत आहेत. नुकतेच खासदार संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी भेट देऊन त्यांना अभिवादन केले. तसेच उद्वव आणि राज ठाकरेंनीदेखील स्मृतीस्थळाला भेट दिली. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांना अभिवादन करत भाजपवर निशाणा साधलाय. काय म्हणाले राज ठाकरे? सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियावर भावपूर्ण पोस्ट लिहिली. शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही, असे ते पुढे म्हणाले.
फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेब असल्याचे म्हणत त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिवादन केले.








