बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या कथित गुन्ह्यांबद्दल मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने तीन गुन्ह्यांप्रकरणी दोषी ठरवत शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अवामी लीगच्या प्रमुखांना सांगितलं आहे की, “या निकालामुळे लोकशाहीत निवडून न आलेल्या अनिर्वाचित सरकारमधील जहाल व्यक्तींचा निर्लज्ज आणि खुनी हेतू उघड झाला आहे”. गतवर्षी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावर प्राणघातक कारवाईचे आदेश दिल्याबद्दल सुरु असलेल्या खटल्याचा निकाल देताना शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आलं. याच आंदोलनामुळे त्यांचं अवामी लीग सरकार कोसळलं होतं.
हसीना यांनी सर्व आरोप फेटाळून लावले, तसंच अवामी लीग आणि स्वतःला “आपला बचाव करण्याची योग्य संधी” न दिल्याबद्दल न्यायालयावर टीका केली. त्यांनी उलट आरोप केले की, न्यायाधीश आणि वकिलांनी सध्याच्या प्रशासनाबद्दल सार्वजनिकरित्या सहानुभूती व्यक्त केली आहे. आयसीटी निकालानंतर काही मिनिटांत जारी केलेल्या निवेदनात, हसीना यांनी निकालावर रोष व्यक्त केला.
“तथाकथित आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने चालवलेल्या खटल्यांचा उद्देश कधीच न्याय मिळवणे नव्हता असं दिसत आहे,” असं त्या म्हणाल्या आहेत. “उलट, त्यांचा उद्देश अवामी लीगला बळीचा बकरा बनवणे आणि डॉ. युनूस आणि त्यांच्या मंत्र्यांच्या अपयशांवरून जगाचे लक्ष विचलित करणे होता,” असा आरोप त्यांनी केला आहे. हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांवर हल्ले केले जातात आणि महिलांचे हक्क (दडपले) जातात असंही त्या म्हणाल्या.
“प्रशासनातील इस्लामिक जहालमतवादी, ज्यात हिज्बुत-ताहिरचे नेते समाविष्ट आहेत, ते बांगलादेशच्या धर्मनिरपेक्ष सरकारच्या दीर्घ परंपरेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत,” असा आरोप माजी पंतप्रधानांनी केला आहे.
न्यायालयाने काय म्हटलं?
हसीना सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी तत्कालीन पंतप्रधानांनी आंदोलनाला कमकुवत केलं आणि विद्यार्थ्यांकडे बोट दाखवून त्यांना ‘रझाकार’ असं संबोधत अपमानजनक टिप्पणी केली, असं न्यायालयाने नमूद केले. त्यानंतर शेख हसीना यांनी निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांना ठार कऱण्याचे आदेश दिले असं न्यायालयाने सांगितलं.
न्यायाधीशांनी नमूद केलं की सरकारी वकिलांच्या साक्षीदारांनी हे सिद्ध केलं की ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील हल्ला छात्र लीग आणि युवा लीगसह अवामी लीगच्या शाखांनी केला होता.
हसीना यांच्यावर आरोप
हसीना, कमाल आणि मामून यांच्यावर खून, हत्येचा प्रयत्न, छळ आणि इतर अमानवी कृत्यांसह पाच आरोप होते. एका प्रमुख आरोपात हसीना यांनी निदर्शकांना संहार करण्याचा आदेश दिल्याचा दावा होता. ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या जनआंदोलनाच्या मागे विद्यार्थ्यांविरुद्ध प्रक्षोभक भाषणे करणे आणि प्राणघातक शस्त्रे वापरण्याचे निर्देश दिल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकार कार्यालयाच्या अहवालात असा अंदाज आहे की 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान “जुलै उठाव” दरम्यान 1400 लोक मारले गेले कारण त्यांच्या सरकारने व्यापक सुरक्षा कारवाईचे आदेश दिले होते.
5 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील उठावावर प्राणघातक कारवाईचा आदेश दिल्याबद्दल खटल्याला सामोरे जाण्याच्या न्यायाधिकरणाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यानंतर 78 वर्षीय हसीना सध्या भारतात निर्वासित जीवन जगत आहेत. मुख्य अभियोक्ता मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी निदर्शनांदरम्यान झालेल्या कथित अत्याचारांचे “मास्टरमाइंड आणि मुख्य शिल्पकार” म्हणून हसीनाचे वर्णन केले आहे. तथापि, त्यांचे समर्थक आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा सांगत आरोप फेटाळून लावत आहेत.








