देशभरात अपेक्षेहून अधिक काळासाठी मुक्कामी असणाऱ्या मान्सूननं आता माघार घेतली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये अद्यापही पावसाचं सावट कायम असून, हा मान्सून नसून समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यासह चक्राकार वाऱ्यांचा परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यानच्या काळात आता देशभरात थंडीचं पर्व सुरू झालं असून, खऱ्या अर्थानं हिवाळा सुरू झाल्याच्या वृत्तावर केंद्रीय हवामान विभाग अर्थात IMD नं शिक्कामोर्तब केलं आहे.
महाराष्ट्रात तूर्तास पावसाची शक्यता नाही, आता दिवस गार वाऱ्याचे…
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात सध्या पावसाची शक्यता नसून काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मात्र, पावसाची शक्यता फारशी नसून ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात उकाडा जाणवेल. तर काही भागांमध्ये दिवस मावळतीला गेल्यानंतर झोंबणारा गार वारा थंडीची चाहूल देऊन जाईल असं सांगण्यात आलं आहे.
राज्यात सथ्या नाशिक, पुणे, सातारा, कोकण इतकंच काय तर मुंबईतही पहाटेच्या तापमानाच बहुतांशी घट पाहायला मिळत असून, येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
यंदाच्या वर्षी पावसाच्या मुक्कामानं हिवाळ्याचं गणित बिघडवलं. मात्र, आता पावसानं उघडीप दिल्यानं हवा कोरडी होत असून, निरभ्र आकाशामुळं किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात पावसाचा अंदाज नसून, मावळतीच्या वेळेसह पहाटेच्या वेळी गारवा जाणवेल. तर, घाटमाथ्यावर धुक्याची चादर पाहायला मिळेल. यादरम्यान दृश्यमानतेवर परिणाम होणार असल्याचाही इशारा देणअयात आला आहे.
पुढील चार दिवसांमध्ये विदर्भासह मराठवाड्यामध्ये तुरळक भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, खऱ्या अर्थानं राज्यात 15 नोव्हेंबरनंतर सुरुवातीला गुलाबी आणि त्यामागोमाग हुडहुडी भरवणारी थंडी पडेल अशी शक्यता आहे. राज्यात सध्या महाबळेश्वरमध्ये किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून, इथं पारा 13 अंशांपर्यंत खाली आल्याचं सांगण्यात येत आहे. तर, निफाडमध्येही चित्र वेगळं नाही. पुणे आणि नागपूरमध्ये तापमानाचा किमान आकडा 19 अंशांवर असून, नाशिकमध्ये हा आकडा 16 अंशांवर असल्याचं सांगण्यात येत आहे.
उत्तरेकडे थंडीचा कहर….
देशात्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला असून, प्रामुख्यानं हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बहुतांश भागांमध्ये पारा शुन्याहूनही कमी झाला आहे. लाहौल स्पितीमध्ये थंडीमध्येच पावसाच्या हजेरीनं तापमानात आणखी घट झाली आहे. तर, जम्मू काश्मीरच्या खोऱ्यासह उत्तराखंडमध्येसुद्धा पर्वतरांगांमध्ये हिमवृष्टीनं हजेरी लावली असून, पुढील 24 तासांमध्ये ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.








