भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेचा शेवटचा सामना शनिवारी ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाणार आहे. पण त्याआधी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या निर्णायक सामन्यावर पावसाचे संकट घोंघावत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्याच्या दिवशी संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस आणि वीजांच्या कडकडाटासह वादळी हवामान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना कमी ओव्हरचा होऊ शकतो किंवा पूर्णपणे रद्द होण्याचीही शक्यता आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया शेवटचा सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी? (Will rain play spoilsport in India hunt for series win)
सध्या भारत मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर भारत पाच सामन्यांची ही मालिका जिंकेल. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर तिसरा आणि चौथा सामना सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने शानदार कामगिरी करत जिंकले.
ब्रिस्बेनमध्ये धो धो पाऊस (Heavy rain in Brisbane weather forecas)
AccuWeather च्या माहितीनुसार, शनिवारी ब्रिस्बेनमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील. दिवसभरातील कमाल तापमान 32 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 21 अंश राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर वाऱ्यांचा वेग वाढेल आणि संध्याकाळी पावसाची शक्यता अधिक आहे. स्थानिक वेळेनुसार टॉस संध्याकाळी 5:45 वाजता होणार असून सामना 6:15 वाजता सुरू होईल, पण याच वेळेत पावसाचा अंदाज चिंताजनक आहे.
पावसाचा अंदाज (स्थानिक वेळेनुसार) :
- संध्याकाळी 5 वाजता : 47% पावसाची शक्यता
- संध्याकाळी 6 वाजता : वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- संध्याकाळी 7 ते 8 वाजता : 49% पावसाची शक्यता
- रात्री 9 ते 10 वाजता : पावसाची शक्यता 60% पर्यंत वाढेलरात्री 11 वाजता : 49% पावसाची शक्यता
म्हणजेच, संध्याकाळ होताच पाऊस सुरू होण्याची आणि नंतर मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. गाबा स्टेडियमचा ड्रेनेज सिस्टम उत्कृष्ट असला तरी सतत पाऊस पडल्यास सामना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टीम इंडियासाठी मोठे आव्हान
भारताची टीम नक्कीच इच्छित असेल की सामना पूर्ण व्हावा आणि विजयानं मालिका संपवावी. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया ही मालिका पराभवाने संपवू इच्छित नाही. त्यामुळे अंतिम निकाल आता पूर्णपणे ब्रिस्बेनच्या हवामानावर अवलंबून असेल.








