बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या आगामी ‘हक’ या चित्रपटाने सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगवली आहे. मात्र, हा सिनेमा आता प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. १९८५ च्या ऐतिहासिक शाहबानो प्रकरणावर आधारित असल्याचं सांगितल्या जाणाऱ्या या चित्रपटावर शाहबानो यांच्या कुटुंबीयांनी कायदेशीर आक्षेप घेतला आहे. कुटुंबीयांचा आरोप आहे की, चित्रपट निर्मात्यांनी शाहबानो यांची जीवनकथा त्यांच्या परवानगीशिवाय वापरली, ज्यामुळे त्यांच्या गोपनीयतेचा भंग झाला आहे. तसेच, चित्रपटातील काही प्रसंग आणि संवाद वास्तवाशी विसंगत आणि विकृत स्वरूपात दाखवले गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
कुटुंबीयांची न्यायालयात धाव
शाहबानो यांच्या मुलगी सिद्दीका बेगम यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात याचिका दाखल करत ‘हक’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी, अशी मागणी केली आहे. हा चित्रपट 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्दीका यांच्या वकिलांनी सांगितलं की, ‘कोणाच्याही जीवनकथेतून प्रेरणा घेत चित्रपट तयार करताना त्या व्यक्तीची किंवा त्यांच्या कुटुंबाची संमती घेणं अत्यावश्यक आहे, अन्यथा ते गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन ठरू शकतं.’
शाहबानो प्रकरण काय होतं?
‘हक’ हा चित्रपट एम.ए. खान विरुद्ध शाहबानो बेगम या ऐतिहासिक प्रकरणावर आधारित आहे. 1932 साली शाहबानो आणि मोहम्मद अहमद खान यांचा विवाह झाला होता. दोघांना पाच मुले झाली. 1978 साली घटस्फोटानंतर 62 वर्षीय शाहबानो यांनी त्यांच्या पतीकडून पोटगीची मागणी करत न्यायालयात दावा दाखल केला होता.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आणि 1985 मध्ये शाहबानो यांच्या बाजूने निकाल लागला. या निकालानंतर मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत देशभरात मोठा वाद निर्माण झाला आणि महिलांच्या अधिकारांसाठी नवा अध्याय सुरू झाला.
नातवाचा आक्षेप
शाहबानो यांच्या नातू जुबैर अहमद खान यांनी सांगितलं, ‘टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आम्हाला समजलं की आमच्या आजीच्या जीवनावर आधारित सिनेमा बनवला गेला आहे. मात्र, अनेक गोष्टी चुकीच्या दाखवल्या गेल्या आहेत. हा आमचा खाजगी कौटुंबिक विषय आहे. त्याला व्यावसायिक रूप देणं चुकीचं आहे. प्रेक्षकांना वाटेल की चित्रपटातील सर्व काही खरं आहे, पण तसं नाही.’
महत्वाचे प्रश्न पुन्हा चर्चेत
‘हक’ चित्रपटाचं दिग्दर्शन सुपर्ण एस. वर्मा यांनी केलं असून, यात इमरान हाश्मी आणि यामी गौतम प्रमुख भूमिकेत आहेत. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाने पुन्हा एकदा महिलांच्या हक्कांवरील कायदे, धर्म आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यातील संघर्ष चर्चेत आणला आहे. शाहबानो प्रकरण हे भारतात धर्मनिरपेक्षतेचा आणि न्यायव्यवस्थेचा परीक्षेचा क्षण ठरलं होतं. त्यामुळेच या प्रकरणावर आधारित चित्रपटाने पुन्हा एकदा कायदेशीर आणि सामाजिक चर्चांना पेटवून दिलं आहे.









