प्रकृतीच्या कारणास्तव शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुढील दोन महिने डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे नित्य नियमाने होणारी आज (1 नोव्हेंबर) पत्रकार परिषद होऊ शकली नाही. मात्र संजय राऊत यांनी आज महाविकास आघाडीसह मनसेचा होत असलेल्या मोर्चावरून मात्र ट्विट करत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे नित्य नियमाची पत्रकार परिषद चुकली असली, तरी त्याच वेळेला आपणास संजय राऊत यांनी क्वीट करत मोर्चावर भाष्य केलं आहे.
मोर्चा ऐतिहासिक क्रांतिकारक आणि निर्णायक ठरणार
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, हा मोर्चा ऐतिहासिक क्रांतिकारक आणि निर्णायक ठरणार आहे. महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दाखवली. ठिणगी पडताना दिसत आहे. जय महाराष्ट्र! या ट्विटसोबत त्यांनी मोर्चाला येण्याचे आवाहन करणारे ग्राफिक्स शेअर केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, बोगस मतदारांचं बोगस रुप उघडं करण्यासाठी सत्याचा मोर्चा, खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चात खऱ्या मतदारांनी सामील व्हा. राऊत निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधी पक्षांच्या निदर्शनात सहभागी होतील अशी अपेक्षा होती. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना विश्रांती घ्यावी लागली आहे.
मोदींकडूनही लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा
दरम्यान संजय राऊत यांनी त्यांच्या प्रकृती संदर्भात त्यांनी काल अपडेट दिल्यानंतर देशपातळीवरून लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संजय राऊत यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्विट करत म्हटले आहे की, “तुमच्या लवकर बरे होण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे, संजय राऊतजी.” संजय राऊत यांनी उत्तर दिले, “माझे कुटुंब तुमचे आभारी आहे.” आरोग्याच्या कारणास्तव, राऊत यांनी सार्वजनिक जीवनातून दोन महिन्यांची विश्रांती घेतली आहे.
राऊत भाजपचे कट्टर टीकाकार
शिवसेना खासदार संजय राऊत राज्यातील एकहाती विरोधी पक्षनेते मानले जातात आणि ते भाजप आणि एनडीए सरकारच्या धोरणांचे निर्भय टीकाकार आहेत. राऊत यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, 2019 आणि 2020 मध्ये त्यांच्या दोन अँजिओप्लास्टी झाल्या होत्या.









