Hasan Mushrif on MNS MVA Mumbai Morcha: निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विरोधात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) आज 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढला जाणार आहे. महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार यादीतील गोंधळ, दुबार नावे, मतचोरी आणि निवडणुकांतील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात हा मोर्चा आयोजित केला आहे. मात्र या मोर्चा आधीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं वक्तव्य केलंय. सदोष मतदारयाद्यांवर निवडणुका नकोत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मनसे आणि महाविकास आघाडीच्या सुरात सूर हसन मुश्रीफ यांचा दिसत आहे. परिणामी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील हाच सुरू असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Hasan Mushrif on MNS MVA Mumbai Morcha: सदोष मतदारयादीवर निवडणुका घेण्यास आमचाही आक्षेप
हसन मुश्रीफ म्हणाले की, आजचा मोर्चा हा इंडिया आघाडीचा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे काय झालं हे आपण पाहिले आहे. सत्याचा मोर्चा म्हणून हा मोर्चा काढला जात आहे. पण ज्या वेळी मतदारांची कच्ची यादी तयार होते त्यावेळी ही बाब निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं. पण ती संधी विरोधकांनी गमावली होती. कितीही यंत्रणा असली तरी आपल्या देशाची लोकसंख्या आज 140 कोटीच्या वर आहे. त्यातले 20 टक्के लोक सोडले तर बाकीचे मतदार आहेत. त्यामुळे काही चुका होतात. मात्र संधी असताना देखील आपण हरकती घेत नाहीत. त्यामुळे अशा चुका प्रशासन दूर करेल. आजचा मोर्चा जर त्यासाठीच असेल तर आमच्या सगळ्याच पक्षांचा सदोष मतदारयाद्यांवर निवडणुका घेण्यास आक्षेप आहे. या याद्या दुरुस्त करण्यास आमची काहीही हरकत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
Hasan Mushrif on MNS MVA Mumbai Morcha: …म्हणून निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी
हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, आता निवडणूक घेतली तर विरोधकांना पराभव दिसतो आहे. त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. प्रत्येक पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी त्यांना व्हीव्हीपॅटवर शंका नव्हती. मनसेमुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे कधीच जुळणार नाही, असे देखील त्यांनी म्हटले.
Hasan Mushrif on Chandrakant Patil: आताच चंद्रकांतदादा चर्चा का करतात?
दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील पलूस येथील कार्यक्रमात पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड हेच उमेदवार असतील, अशी अनौपचारिक घोषणा केली. मंत्री पाटील यांच्या विधानाने पुणे पदवीधरमधील उमेदवारीवरुन भाजप आणि राष्ट्रवादी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे, याबाबत विचारले असता हसन मुश्रीफ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य त्या ठिकाणी युती होत नाही, त्याठिकाणी आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. मात्र एकमेकांवर टीका केली जाणार नाही, महायुतीचा झेंडा फडकवला जाईल. अजून पदवीधरच्या निवडणुकीला दीड वर्ष आहे. आताच चंद्रकांतदादा चर्चा का करतात हे कळत नाही. आम्ही शरद लाड कसे पराभूत होणार हे देवेंद्र फडणवीस यांना पटवून देऊ. अरुण लाड यांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं की, पुढच्या वेळी भैया माने यांना उमेदवारी देऊ. चंद्रकांतदादा भेटल्यानंतर आम्ही विचारू की, आताच उमेदवारी घोषित करण्याचं कारण काय? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.








